दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

0

जळगाव । दि. 22 । प्रतिनिधी-शहरातील जे.के.पार्क परिसरातून दरोड्याच्या तयारीत असतांना सहा जणांच्या टोळीला दरोडयाच्या साहित्यांसह एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्रीत 2.30 वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

त्याच्याकडून कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून या सहा जणांविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांना जे.के पार्क परिसरात काही संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली.

पोनि.अढाव यांनी गस्तीवर असलेले पीएसआय रोहन खंडागळेय यांनी सहकार्‍यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय खंडागळे यांनी विजय नेरकर, समीर तडवी, शरद भालेराव, शिवदास नाईक, सचिन मुंडे, अशरफ शेख, विजय पाटील, गोंविदा पाटील, किशोर पाटील यांचे पथक तयार करून जे.के पार्क परिसरात तपासणी केली.

यावेळी शिवाजी पुतळयाच्या मागे एमएच 18 एए 1786 क्रमांकाची कार संशयास्पदरित्या दिसून आली. कारमधील दोघांची चौकशी केली असता,मोहम्मद कासिम अब्दुल रज्जाक व मोहम्मद जफर गुलाब नबी रा. दोघे पाळधी ता. धरणगाव या दोघांना पोलिसांनी सुरवातीला ताब्यात घेतले.

त्यानंतर कारची तपासणी केल्यानंतर कारमध्ये दोन कोयते, दोरी, लोखंडी पाईप व मिरची पावडर आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात तपासणी केल्यानंतर मोहम्मद रियाज गुलाब नबी, इम्तियाज अयाज कुरेशी, मोहम्मद वसीम मोहम्मद कासीम कुरेशी व फयाज मोहम्मद अयाज कुरेशी सर्व रा.पाळधी, ता.धरणगाव या चौघांनाही देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान पोलिसांनी या सर्व संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी दरोड्याच्या प्रयत्नात असल्याची कबुली पोलिसांनी दिली. या सर्व संशयितांविरुध्द दरोड्याचा प्रयत्न केला म्हणून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

24 पर्यंत पोलीस कोठडी
एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना आज न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात कामकाज होवून न्या.गोरे यांनी सर्व संशयितांना दि.24 पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.तडवी यांनी कामकाज पाहिले. यातील काही संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*