मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रला जळगावातून सुरवात

0

जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-येत्या 18 महिन्यात म्हणजेच 15 ऑगस्ट 2019पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला असुन या मोहीमेला दि. 23 रोजी जिल्हा सामान्य रूग्णालय जळगाव येथुन सुरवात होणार आहे.

मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र मोहीमेच्या नियोजनाची जबाबदारी राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या मोहीमेसंदर्भात आज पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.

याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, रामेश्वर नाईक, पितांबर भावसार, अरविंद देशमुख यांचेसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. लहाने म्हणाले की, राज्यात मोतीबिंदूचे सुमारे 17 लाख रुग्ण आहे. या रुग्णांना दृष्टि देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून येत्या 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर या तालुक्यातील प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात येणार आहे.

ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल त्यांना 23 तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख स्वत: तपासणी करणार आहे. ज्या रुग्णांच्या डोळयात मोतीबिंदू आढळेल त्यांचेवर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शस्त्रक्रिया करतांना दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*