ठेवी न मिळाल्यास रक्त सांडून निषेध

0

जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील विविध 174 पतसंस्थांच्या व बीएचआर मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात म्हणून येत्या 15 दिवसांत ठोस कृती कार्यक्रम जाहीर करा त्यासाठी पुनर्रआढावा बैठक घेण्यात यावी अन्यथा ठेवीदार एकत्रित रक्तदान शिबीर घेऊन सहकार राज्यमंत्री अथवा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोर रक्त सांडून शासनाचा निषेध व्यक्त करतील असा ईशारा ठेवीदारांच्या वतीने लाक्षणिक उपोषणावेळी देण्यात आला.

जनसंग्राम बहुजन लोकमंच पार्टीच्या ठेवीदार समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेविंच्या निपटार्‍यासाठी ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

जिल्ह्यातील 200 ते 250 ठेवीदार उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके व उपनिबंधक विशाल जाधवर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात ईशारा देत नमूद करण्यात आले आहे की,सहकार व लेखापरीक्षक विभागाच्या अधिकार्‍यांनी साटेलोटे केल्याने व पतसंस्थाचालकांच्या राजकीय व आर्थिक दबावाने जिल्हा प्रशासन ठेविंच्या प्रश्नी निपटारा करण्यात दुर्लक्ष करीत आहे.सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहा महिन्यात ठेवी परत न केल्यास बुटाने मारा असे सांगितले होते.

दरम्यान,सहकार आयुक्तांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वर्षभरापासुन ठेवी परत करण्याचा कृती कार्यक्रम ठप्प आहे.त्यामुळे सहकार राज्यमंत्र्यांचे त्यांच्याच खात्यावर नियंत्रण नसल्याची टीका सुद्धा निवेदनात करण्यात आली आहे.

कर्ज वसुली व ठेवी वाटपास येत्या पंधरा दिवसात चालना न मिळाल्यास ठेवीदारांच्या वतीने रक्त सांडून निषेध आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

उपोषणास बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक मुकुंद सपकाळे, प्रा.डॉ.जी. पी.पाटील व सहकार्‍यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला.यावेळी डी.टी. नेटके, यशवंत गाजरे, डॉ.दिलीप पाटील, चैतन्य बोरोले, गणेश भंगाळे, आशा नेमाडे, विष्णू जावळे, गजानन राऊत, तुकाराम फेगडे, एकनाथ भंगाळे, श्रीधर पाटील, सीताराम इंगळे, मधुकर भिरूड, बळीराम वाघुळदे, भास्कर चौधरी,शांताराम सोनार, सुकलाल कोल्हे, नामदेव भोळे, किरण राणे आदी ठेवीदारांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*