दाणाबाजारात अवजड वाहनांसाठी ‘टाईम झोन’

0

जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-रस्ता सुरक्षा अभियानाबाबत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची बैठक झाली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दाणाबाजारात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने टाईमझोन निश्चित करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान शहरात अतिक्रमण निर्मुलन कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. उद्या दि.21 रोजी सकाळी 8 ते 8.30 वाजेपासून पोलीस बंदोस्त कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली.

महानगरपालिकेतर्फे शहरात सहा दिवस अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 250 कर्मचार्‍यांचे पाच पथक नेमण्यात आले आहे.

पाच ते सहा ट्रॅक्टर आणि जेसीबी देखील अतिक्रमण विभागाला उपलब्ध करुन दिल्या आहेत. सकाळपासून कारवाई करण्यात येणार होती त्यासाठी मनपाचे कर्मचारी सकाळपासून हजर झाले होते. परंतु पोलीस प्रशासनाने बंदोबस्त न दिल्याने ही कारवाई उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे.

पार्किंगसाठी धोरण निश्चित करणार !

महापालिकेच्या अधिकार्‍यांसह पोलीस अधिकार्‍यांनी बाजारपेठेत पाहणी केली. दरम्यान, रहदारी असलेल्या रस्त्यांवर वन-वे बाबत चर्चा करण्यात आली.

तसेच 8 ते 10 ठिकाणी नो-पार्किंग जाहीर करण्यात येणार आहे. तसेच दुकानांसमोरील अनधिकृत बांधण्यात आलेले रॅम व वेदरशेड काढण्याची सूचना देण्यात आली आहे.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या बैठकीत कारवाईबाबत चर्चा

रस्ता सुरक्षा अभियानाची पोलीस अधिक्षक कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, डिवायएसपी सचिन सांगळे, वाहतुक शाखेचे पोनि. विलास सोनवणे, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारिया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अतिक्रमण निर्मुलन कारवाईसह टाईमझोनबाबत आणि पार्किंगच्या धोरणाबाबत चर्चा झाली.

दाणाबाजारात अवजड वाहतुकीस बंदी

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दाणाबाजारात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.

त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी टाईमझोन निश्चित करण्यात आला आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुपारी 2 ते 4 या वेळेत अवजड वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*