बोदवडचे उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण अपात्र

0
जळगाव |  प्रतिनिधी :  बोदवड नगरपंचायतीचे शिवसेनेतुन फुटुन गेलेल्या भाजपचे उपनगराध्यक्ष नितीन रमेश चव्हाण यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनी आज अपात्र केले आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे नितीन चव्हाण हे निवडून आले होते. २७ नोव्हेंबर २०१६ ला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यात शिवसेनेतर्फे व्हिप काढून चव्हाण यांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक झांबड, उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार अफरीन बानो शेख असलम यांना मतदान करण्यास सांगितले होते.

मात्र चव्हाण यांनी भाजपच्या बाजूने मतदान करून व्हिप नाकारला होता. स्वतः भाजपतर्फे उपनगराध्यक्षपदाचा अर्ज भरून उपनगराध्यक्ष झाले होते. त्यावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नितीन चव्हाण यांना अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती.

त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी सुनावणी घेतल्या. सुनावणीअंती आज जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनी उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*