शेतात वीज नसतांनांही दिले ४२ हजाराचे बील

0

दिग्विजीय सूर्यवंशी | शेंदुर्णी, ता. जामनेर :  येथील एका शेतकर्‍याला वायफाय वीज वापरल्याचे बेचाळीस हजाराचे वीजबील देण्यात आले आहे. महावितरण आपल्या दारी योजनेच्या लाभासाठी २०११ मध्ये त्याने डिमांड नोट भरली होती. परंतू, शेतात दुरवर कोठेच वीज तारच दिसत नाही. असे असतांनाही महावितरने तब्बल सहा वर्षानंतर थेट थकबाकीचे बिल दिल्याने शेतकर्‍याच्या पायाखालची जमीनच सरकली.

शेतकरी भगवान सोनार यांच्या मालकीचे पहुर शेंदुर्णी राष्ट्रीय महामार्गाला लागुन शेंदुर्णी शिवारात शेतजमीन आहे. सदर शेतजमीन वडिलोपार्जीत आहे. या शेतजमीनीवर १९९८ मध्ये विहिर बांधली. परंतु, सदर विहिरीवरील वीज मोटरीसाठी दुरवर वीज कनेक्शन नसल्याने तसेच, दक्षिण बाजुने राष्ट्रीय मार्ग आणि उत्तरेस पाचोरा जामनेर पॅसेंजरची रेल्वेलाईन असल्याने दिडशे मीटरपेक्षा जास्त लांबवर वीज जोडणी तार असल्याने वीजजोडणीसाठी पाच ते सहा पोल टाकून वीज जोडणी करावी लागणार आहे. त्याचा खर्चही सबंधित शेतकर्‍याला करावा लागणार होता.

डिझेल मशिनने उपसले पाणी

श्री.सोनार यांनी या सर्व भानगडीत पडण्यापेक्षा डिझेलवर चालणारे पीटर मशीन बसवून घेतले. दिवसाला सरासरी सहा लीटर डिझेल लागते. आजतागायत पीटर मशिनने उपसा सुरू आहे.

वीज जोडणीसाठी सहा वर्षांपुर्वी अर्ज

श्री. सोनार यांनी सहा २०११ मध्ये महावितरण आपल्या दारी या कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज केला होता. वीज जोडणीसाठी रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्गाच्या शासकीय अडचणी तसेच वीज जोडणीसाठी पाच ते सहा पोलसाठी लागणारा खर्च येणार होता. तो खर्च पहाता २०११ साली महावितरणच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत अर्ज केला होता.

त्यावेळी साडे दहा हजार डिमांड नोट भरली. त्यानुसार त्यांना वीज कनेक्शन मंजुर झाले. त्यानुसार त्यांनी दोन ते तीन वर्ष वारंवार पाठपुरावा करून देखील मंजुर वीज कनेक्शननुसार त्यांच्या शेतापर्यंत ना पेाल पोहचले ना वीज आली. अखेरीस श्री. सोनार यांनी महावितरणचा पुनःश्च नाद सोडून दिला.

सहा वर्षांनी प्राप्त झाले थकबाकीचे बील

परंतू, काल दि. १५ रोजी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ असलेले महावितरण तर्फे बेचाळीस हजाराचे थकबाकी बील आल्याने श्री. सोनार यांच्या पायाखालची जमीन सरकली.

बीलामध्ये चालु बील २७३८ रुपये, मागील थकबाकी २६,५७३ रुपयांची तर त्यावरील व्याजाची थकबाकी १३,४८८ रुपये अशी एकुण थकबाकी ३९,७३८ रुपये पुर्णांक देयक ४२,४८० रुपये. सोबतच बीला मध्ये ५ हजार २५१ रुपयांचे सहा सुलभ हप्त्यांची माहिती देखील देण्यात आली आहे.

तसेच २६ हजारांचे वीजबील दि. १५ नोव्हेंबरपर्यंत चालु देयक भरल्यास आणि पुढील सुलभ हप्ते भरल्यास दंडनिय व्याज माफ करण्यात येणार असल्याची वैशिष्टे देण्यात आली आहे.

महावितरण आपल्या दारी योजना

२०११ साली महावितरणने कृषीपंपाची वीजचोरी, शेतकर्‍यांना वीज कनेक्शन घेणे सोपे व्हावे यासाठी महावितरण आपल्या दारी हि योजना सुरू करण्यात आली. परंतु, इतर योजनांसारख्या याही योजनेला प्रशासनाकडूनच केराची टोपली दाखवून कागदोपत्री अमलबजावणी केली .

या योजने अंतर्गत ३ एचपीचा प्रवाह देण्यासाठी विहीर आणि वीज तारा तीस मीटरपेक्षा कमी असल्यास त्वरीत केबल द्वारे कनेक्शन द्यावे तसेच, तीस मीटरपेक्षा जास्त असल्यास वीजप्रवाह विहीरीपर्यंत आणण्यासाठी लागणारा पोल आणि तारांचा खर्च शासनाने करून शेतकर्‍याला वीज कनेक्शन वितरीत करायचे होते.

वायफाय जोडणीचा जावईशोध

शेतकर्‍याला कोणतीही पुर्व सुचना नसतांना कागदोपत्री केबल कनेक्शन दाखवून वीज वापरल्याचे थकीत बील पाठविले .
परंतु, प्रत्यक्ष शेतामध्ये वीज कनेक्शन नाही, दुरपर्यंत तारा जोडलेल्या नाहीत आणि विशेष बाब म्हणजे मीटरचा तर पत्ताच नसतांना स्वखर्चाने डिझेलवर चालणार्‍या पीटर मशीन मध्ये वायफाय द्वारे वीज प्रवाह सुरु करून पीटर मशिन तर चालवले नाही ना ! असा प्रश्न भगवान सोनार यांना पडला आहे.

महावितरणच्या अधिकार्‍यांच्या कुंभकरणी झोपा

येथील इंजिनीयर यांना शेतात कनेक्शन नसल्याबाबत पुर्वकल्पना होती. कारण श्री. सोनार यांनी सोलरपंपसाठी अर्ज करीत असल्याने प्रत्यक्ष पहाणी देखील केल्याचे श्री. सोनार यांनी सांगितले. तसेच, माहिती असतांना देखील काल दि. १५ रोजी शेवटच्या दिनांकाला थकीत वीज बील पाठविल्याने आश्चर्य व्यक्त केले. माझ्या शेतात वीज जोडणी कोणत्या माध्यमातुन करुन वायफाय वीज वापराचे बील पाठविले असा प्रश्न उपस्थित केला.

LEAVE A REPLY

*