‘तापी’त बंधार्‍यासाठी 30 कोटी मंजूर

0

नीेरज वाघमारे,भुसावळ । दि.15-भुसावळसह परिसराला लाभलेली सूर्यपुत्री तापी नदीपात्रात आ.संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे अमृत योजनेंतर्गत 30 कोटी रुपयांचा 800 मीटर लांब बंधारा बांधुन त्यात पाणी अडविले जाणार असल्याने भुसावळ शहर वासियांसाठी शाश्वत पाणीसाठ्याचा स्त्रोत निर्माण होणार असल्याने शहरात निर्माण होणारे पाणी टंचाईचे किमान 50 वर्षांचे दुर्भिक्ष्य कमी होणार आहे.

भुसावळ शहराला लाभलेली तापीनदी ही वरदान असली तरी नैसर्गिक ऋतू चक्रात फेर बदल झाल्यास पर्जन्यमान कमी होते. त्यामुळे पूर्वीच असलेल्या तापी नदीपात्रातील इंजिनघाट परिसरात असलेल्या रेल्वे बंधार्‍यात साठलेल्या पाण्यावर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागते.

ब्रिटीश काळापासून हा उभारला गेलेला बंधारा त्यानंतर आज शहराची वाढलेली लोकसंख्या यामुळे पाण्याची वाढती मागणी व होणारा पाणी पुरवठा यात ताळमेळ बसवितांना अनेकदा पालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन आ.संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात लागू होणार्‍या अमृत योजनेंतर्गत तापी पात्रात भुसावळ शहर वासियांसाठी शाश्वत बंधारा व्हावा या उद्देशाने तापी नदी पात्रात 800 मीटर लांब व साडेचार ते पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा त्यात उपलब्ध राहील या हिशोबाने बंधार्‍याची उंची व रुंदीचे नाशिक येथील सरकारी कंपनीकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे.

या बंधार्‍यासाठी 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बांध निर्मितीसाठी दिड वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. सध्या शहरात रेल्वे बंधार्‍यातील जलसाठ्यातून पाणी पुरवठा होत आहे.

मात्र संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून या बांधावर तात्पुरता उंची वाढवून वेळ निभावून नेली जात आहे. मात्र या पर्यायी व्यवस्थेला कायमस्वरुपी उपाय व्हावा व भविष्यातील पाण्याचे नियोजन केले जावे.

या उद्देशाने रेल्वे बंधार्‍याच्या पुढे या नवीन बंधार्‍याचे काम केले जाणार आहे. यासंदर्भात कामाची निविदा प्रक्रिया आटोपली असून आ.संजय सावकारे यांनी मागील आठवड्यातच या कामी पाठपुरावा करुन बंधार्‍याच्या ठेकेदाराशी चर्चा केली. तापी नदी पात्रातील खडक परिक्षणाची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून त्यानंतर बंधारा निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे आ. संजय सावकारे यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

या नुतन बांध निर्मितीमुळे शहर वासियांना दुहेरी लाभ मिळून पालिकेसही पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. कारण रेल्वे बंधार्‍यातील अडलेला जलसाठा व नुतन बंधार्‍यातील जलसाठा हा उपलब्ध राहील.

शिवाय पालिका या बंधार्‍या शेजारील वन जमिनीवर उद्यान व पिकनिक स्पॉट तयार करणार आहे. नुतन बंधार्‍यातील जलाशयात बोटींग, नदी पात्रालगत वाटर पार्कची सुविधाही करण्यात येणार आहे. यामुळे बंधार्‍यासह शहरात पिकनिक स्पॉट होवून पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

LEAVE A REPLY

*