107 सिंचन प्रकल्पांना मान्यता

0

नवी दिल्ली/मुंबई । दि.14 । विशेष प्रतिनिधी-विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणार्‍या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारकडून तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत दिली.

राज्यातील महत्त्वाच्या 107 सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारचे सहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर केला होता.

त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्ली येथे वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेनंतर जेटली यांनी या प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये निती आयोगाच्या पदाधिकार्‍यांशी देखील चर्चा केली.

प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यावेळी उपस्थित होते. या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात लवकरच करार करण्यात येणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*