मनपातील 49 सह्याजीराव कर्मचारी बडतर्फ

0

जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-विनापरवानगी गैरहजर राहणार्‍या तसेच स्वाक्षरी करुन निघून जाणार्‍या 62 सह्याजीराव कर्मचार्‍यांना प्रभारी आयुक्तांनी बडतर्फ का करण्यात येवू नये ? अशा आशयाची नोटीस बजावली होती.

तसेच तीन दिवसात खुलास मागविण्यात आले होते. त्यानुसार संबंधित सह्याजीराव कर्मचार्‍यांचे प्राप्त झालेले खुलासे असमाधानकारक असल्याने 49 सह्याजीराव कर्मचार्‍यांना आज बडतर्फ करण्यात आले.

बडतर्फीचे आदेश प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जारी करताच अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सह्याजीराव कर्मचार्‍यांवर लक्षकेंद्रीत करण्यात येत आहे. जळगाव शहरात साथीच्या आजाराचा फैलाव होत असतांनाही कर्मचारी विनापरवानगी गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही कर्मचारी केवळ स्वाक्षरी करुन निघून जात असल्याच्या तक्रारी आहेत.

याबाबत विभागप्रमुखांकडून देखील आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार यापूर्वी निलंबित करण्यात आलेले 17 कर्मचारी आणि विविध विभागातील 45 कर्मचारी असे एकूण 62 कर्मचार्‍यांना महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 56 नुसार बडतर्फ का करण्यात येवू नये? अशा आशयाची नोटीस बजावली होती.

तसेच तीन दिवसात खुलासे देखील मागविण्यात आले होते. काही कर्मचार्‍यांचे खुलासे प्राप्त झाले. मात्र त्यांचे खुलासे असमाधनाकारक होते.

तर काही कर्मचार्‍यांनी खुलासे न दिल्याने आज 49 कर्मचार्‍यांवर बडतर्फ कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी जारी केले. बडतर्फच्या कारवाईमध्ये दोन नगरसेविकांचे पती आणि काही नगरसेवकांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.

अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये खळबळ
महापालिकेच्या इतिहासात प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बडतर्फ करण्याची कारवाई सुरु केली आहे.

यापूर्वी दोन अभियंत्यांसह 20 कर्मचार्‍यांवर तर आज 49 कर्मचार्‍यांवर असे एकूण 69 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आल्याने मनपा अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

येत्या तीन-चार दिवसात पुन्हा काही सह्याजीरावांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

या कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती
महापालिकेच्या विविध विभागातील 49 कर्मचार्‍यांची मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 56 नुसार सेवा समाप्त करण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी बजावले. यात शिवाजी पवार, कैलास कोळी, अरविंद भोळे, कालिदास सोनवणे, संजय काळे, अनिता सपकाळे, शंकर सोनवणे, भास्कर कोळी, सतिश पाटील, निता अटवाल, सुरेखा पाटील, प्रतिभा पाटील, मोतीलाल सपकाळे, साहेबराव सपकाळे, परशुराम सोनवणे, एकनाथ चौधरी, रमेश सोनवणे, रामचंद्र सपकाळे, सुभाष बाविस्कर, मंगला ठाकुर, हिराबाई कोळी, नवीन पवार, घनश्याम कोल्हे, विनायक नन्नवरे, राजू सपकाळे, उषाबाई सपकाळे, कल्पना मिस्तरी, विक्रम पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय सोनवणे, शेखर सोनवणे, सुनिल अत्तरदे, दिलीप नारखेडे, गंगाधर गायकवाड, मोहन बेंडाळे, नितीन पवार, चंद्रशेखर जोशी, अनिल ढंढोरे, सुरेश सोनवणे, इकबाल खा. उस्मान खा., रफिक मेहमुद, योगेश पाटील, आरीफ पठाण, जितेंद्र यादव, दिनेश नन्नवरे, जगतसिंग पाटील, मनोज सोनार, मोहन पालवे, संजय सोनवणे या कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*