वाघूर-भादली कालवा, जलवाहिनी वितरणाच्या 125 कोटींचे काम जैन इरिगेशनला

0

जळगांव, । दि. 13 । प्रतिनिधी-राज्य शासनाच्या जलस्रोत विभागाच्या तापी जलसिंचन विकास निगमच्या गौरवशाली वाघूर-भादली कालवा आणि भादली दबावयुक्त जलवाहिनी वितरणाच्या भविष्यवेधी सूक्ष्मसिंचन प्रकल्पासाठी ई-टेंडरच्या प्रक्रियेव्दारे जैन इरिगेशनची निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या ‘भविष्य प्रतिबद्ध सूक्ष्म सिंचन प्रकल्प’ अंतर्गत जिल्ह्यातील 16 हजार 536 एकर अधिकार क्षेत्राला व 5 हजार पेक्षा अधिक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचे मूल्य 125.73 कोटी इतके आहे. या प्रकल्पामुळे पाणी वापराची क्षमता 50 टक्क्यांनी वाढणार आहे.

पारंपरिक पद्धतीत निर्माण होणार्‍या भूसंपादनाच्या समस्या व हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यांचा विचार करता महाराष्ट्र शासनाने पहिला ‘फ्युचर रेडी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट तयार केला आहे.

सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या भविष्यातील शेतीमधील वापरासाठी 20 मीटर ऊर्वरित दाबासह ‘हर खेत को पानी’ हा अव्दितीय प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाचे मूल्य 125.73 कोटी आहे. या प्रकल्पात सुरवातीला कालव्या जवळील पंपहाऊसचे बांधकाम करणे, दबावयुक्त एचडीपीई पीव्हीसी पाईपांचे वितरण जाळे निर्माण करून ते शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविणे, विद्युत वाहक तारा, सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर केंद्रे आणि पंपिंग स्थानकांवरील आवश्यक त्या पायाभूत विद्युत सुविधांचे बांधकाम आणि पुरवठा करणे, जल ग्राहक संघटनांची स्थापना करून जल ग्राहक संघटनांना आणि विभागीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणे यासह पाच वर्ष या प्रणालीची देखभाल करणे आदी कामे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणार आहे.

पाईपमार्फत बांधापर्यंत पाणी
कालव्यातून पाणीवापराचे नैपुण्य सुधारण्यासाठी पाईपमार्फत शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी पुरवठा करण्यात येईल. यामुळे शेतीमधील सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढेल. भादली शाखेच्या कालव्यातून आणि डीवाय कालव्यातून पाणी उपसून कमीत कमी 20 मीटरचा उर्वरित दाब राखून शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, ज्याव्दारे शेतकर्‍यांना आपल्या शेतात ठिबक सिंचनाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी मदतरूप ठरणार आहे. सूक्ष्म सिंचनाच्या वापरातुन ‘पाणी थेंबाने पिक जोमाने’ यानुसार जैन इरिगेशन या प्रकल्पात हातभार लावणार आहे.

योजनेची वैशिष्टये
या योजनेत कालव्यांचे विभाजन, शेती नालेबांधणी, लिफ्ट इरिगेशन त्याचबरोबर जल वितरण व्यवस्थेचा विकास इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. आधुनिक आणि कार्यक्षम सिंचन पद्धतीची निर्मीती करणे उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेन गन इत्यादींचा वापर वाढविणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा विकास करून त्याची जलस्त्रोतांची जोडणी करणे, सिंचनाच्या आधुनिक पद्धतींवर संशोधन करणे, त्याचे प्रशिक्षण देणे व पाणी संरक्षणासाठी लोकांना जागरूक करणे त्यासाठी विस्तार कार्यक्रम राबविणे इत्यादी उपक्रमांचा या योजनेत समावेश आहे.

पाण्याचा वापर 50 टक्क्यांनी वाढणार
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रेशराईज्ड पाईप डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क (पीडीएन) आणि मातीवरील सूक्ष्म सिंचन (ड्रिप/स्पिंक्लर) प्रणालीचा वापर करून कालवा क्षेत्रातील 50 ते 55 टक्के पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. पर्यायाने शेतकर्‍यांना पाणी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ठिबक सिंचनाव्दारे मिळणार्‍या पाण्याचा सुयोग्य वापर वाढणार असल्याने उत्पादन क्षमता वाढुन शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे.

LEAVE A REPLY

*