ना.महाजनांच्या बैठकीनंतर प्रशासनाला जाग

0

जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-जळगाव शहरात गेल्या तीन महिन्यांपासून साथीच्या आजाराचा फैलाव होत आहे. आतापर्यंत 10 ते 12 आणि येत्या आठ दिवसात डेंग्यूमुळे पाच जणांना जीव गमवावे लागले आहे.

शहरात साथीच्या आजाराची गंभीर परिस्थिती उद्भवली असतांनाही प्रशासन मात्र निद्रीस्त अवस्थेत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीष महाजन यांनी तातडीची बैठक घेतल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली.

दरम्यान अप्पर आयुक्तांनी दुपारी तर आयुक्तांनी सायंकाळी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेवून अ‍ॅबेटींग, फवारणी, धुरळणीसह स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना दिली. त्यासाठी 1 लाख 80 हजाराची जंतु व तणनाशक औषधांची खरेदी करण्यात आली.

मनपात काल ना.गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले.

त्यामुळे अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलेरिया विभाग यांची बैठक घेवून सूचना दिल्या.

धुरळणी, फवारणी आणि स्वच्छता मोहिमेसह जनजागृती करुन आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्याबाबत सांगितले. तसेच सायंकाळी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून आढावा घेतला. तसेच अधिकार्‍यांना त्यांनी धारेवर देखील धरले.

परिसरातील डबक्यांचे सर्व्हेक्षण
शहरात अनेक भागांमध्ये पाण्याचे डबके साचलेले आहे. त्यामुळे डासांचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शहरातील ज्या-ज्या ठिकाणी डबके साचलेले आहेत. अशा डबक्यांचे सर्व्हेक्षण करुन अ‍ॅबेटींग करण्याबाबत सूचना दिल्या.

माहिती पत्रकाद्वारे जनजागृती
जळगाव शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया स्वाईन फ्ल्यू अशा साथीच्या आजाराने जळगावकरांना ग्रासले आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी परिसर स्वच्छ ठेवा, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा यासह लक्षण आणि उपाययोजनांबाबत माहिती असलेल्या पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली.

जंतुनाशक औषधीची खरेदी
शहरातील मोकळ्या जागांवर साफसफाई होत नसल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. गवत देखील वाढले आहे. परिणामी डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तात्काळ 1 लाख 80 हजाराची जंतु व तननाशक औषधी खरेदी करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.

चार जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता
महापालिकेच्या चार जेसीबीच्या माध्यमातून शहरातील मोकळा जागा स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच डोजर देखील भाडेतत्वाने घेण्यात आले आहे. चार मालवाहु रिक्षाच्या सहाय्याने सकाळी आणि सायंकाळी या दोन शिफ्टमध्ये फवारणी आणि धुरळणी करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*