जळगावात डेंग्यूचा चौथा बळी :डॉक्टराचा उपचारादरम्यान मृत्यू

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  गेल्या दोन महिन्यापासून शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जळगावातील ईश्‍वर कॉलनी परिसरातील रहिवाशी असलेल्या डॉक्टरचा डेंग्यूच्या आजाराने उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. डेग्यूच्या आजारामुळे जळगावात चौथा बळी घेतल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील ईश्‍वर कॉलनीतील रहिवाशी डॉक्टर प्रशांत अनंत सरकार वय ४५ (मुळ रा. कलकत्ता)हे गेल्या ८ ते १० दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काल दि.११ पासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.

आज सकाळी त्यांना शहरातील ओम क्रिटीकल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट तपासले असता, सरकार यांना डेंग्यू व निमोनिया झाल्याचे निर्दशनास आले. त्यानुषंगाने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मुंबई किंवा औरंगाबाद येथे हलविण्याचा नातेवाईकांना सल्ला दिला. सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक होवून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.डॉ. सरकार यांचे शहरातील रथ चौकात क्लिनीक आहे त्यांच्या पश्‍चात पत्नी गिता, मुलगा प्रितम, पियुश असा परिवार आहे. दरम्यान मृतदेह डॉ.सरकार यांच्या मुळगावी उद्या दि.१३ रोजी गितांजली एक्सप्रेसने नेण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

अन् आता डॉ.प्रशांत सरकार यांचा मृत्यू

मागील दहा दिवसात तेजस नाईक, जितेंद्र बडगुजर व ईशिता बुंदले आणि त्यानंतर आता डॉ.प्रशांत सरकार यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.शहरासह जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर घेतल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*