कर्जमाफीसाठी रस्त्यावर येणार

0

दिंडोरी । दि.11 । प्रतिनिधी-राज्यभर लागलेल्या कर्जमाफी फलकाची वस्तुस्थितीशी विसंगती आहे. प्रत्यक्षात अशी कोणताही ठळक कर्जमाफी झाली नाही.

कर्जमाफीसाठी सरकारने 25 नोव्हेंबर ही अंतिम मुदत मागितली आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू. त्यानंतर मात्र ती झाली नसल्याची खात्री झाल्यास रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.

कर्जमाफीचा घोळ अद्यापही सुरू आहे. कर्जमाफीचे समाधान शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर जाणवत नसल्याचेही पवार म्हणाले.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडीस्थित सह्याद्री फार्म हाऊस येथील बैठकीसाठी आलेल्या पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

प्रत्येक आंदोलनकर्ता राष्ट्रवादीचा वाटतो
मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन जाणारा प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आंदोलनकर्ता मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता वाटतो, असे पवार म्हणाले. मंत्रालयावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असा आरोप होत आहे, यावर पवारांनी हे वक्तव्य केले.

गुजरातेत काँग्रेससोबतच
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ‘जय गुजरात’चा नारा दिला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 9 ते 10 जागांवर काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडीस्थित सह्याद्री फार्म हाऊस येथील बैठकीसाठी आलेल्या पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

सरकारकडून शेतकर्‍यांची टिंगल
शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील घोळाचा उल्लेख करताना पवार म्हणाले, काही शेतकर्‍यांना 33 रुपये तर काहींना 120 रुपये प्रमाणात ही माफी मिळाली आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने शेतकर्‍यांची टिंगलटवाळी केली आहे. वस्तुत: हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यूपीए सरकारच्या काळात आम्ही 71 हजार कोटींची कर्जमाफी केली होती, याचे स्मरणही पवार यांनी यावेळी करून दिले. शासनाने बँकिंग व्यवस्थेसोबत कर्जमाफीविषयक चर्चा केली आहे. सदर कर्ज सहा-सात वर्षांच्या मुदतीत राईट ऑफ करावे, असा प्रस्ताव शासनाने दिल्याची आपली माहिती असल्याचे पवार म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*