ट्रक टर्मिनन्स्साठी आसोदा येथील शेतकर्‍यांचा विरोध

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-मौजे आसोदा येथील आरक्षण क्र.227 मधील जागा ट्रक टर्मिनन्स्साठी भूसंपादनाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी दि.16 रोजी महासभा होणार आहे. मात्र येथील शेतकर्‍यांनी भूसंपादनाला विरोध केल्यामुळे काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागले आहे.

ट्रक टर्मिनन्स्साठी जागा आरक्षित असून ती महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पत्र दिले होते. मात्र जागेची मोजणी करतांना शेतकर्‍यांनी विरोध केला. महापौर यांनी ट्रान्सपोर्ट नगर असोदा शिवारात आरक्षित ट्रान्सपोर्टनगरची जागा भूसंपादन करणेबाबत आयुक्तांना पत्राद्वारे सूचित केले होते.

परंतु शेतकर्‍यांचा विरोध असल्यामुळे मोजणी होवु शकली नाही. दि.13 ऑक्टोबर 2017 रोजी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि आ.राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि मनपा अधिकारी, भूसंपादन अधिकारी यांची संयुक्तीक बैठक झाली.

परंतु या बैठकीत देखील शेतकर्‍यांनी विरोध केला. ट्रक टर्मिनन्स्साठी जागा भूसंपादन करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.

दि.16 रोजी सकाळी 11 वाजता महापौर ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे. या महासभेत जागा भूसंपादनाबाबत काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागले आहे.

तसेच मेहरुण तलावाच्या चोहुबाजूस विकास करणे, शहराच्या मंजूर विकास योजनांमध्ये आरक्षण क्र.13 अग्निशमन विभागांतर्गत मौजे जळगाव शिवार स.नं. 415 या जमिनीपैकी बाधित जमिनीचे भूसंपादन करणे, रामनगर येथील मनपा शाळा क्र.50 येथील चार खोल्या भाडेकराराने देणे यासह सात विषयांवर महासभेत चर्चा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*