शेतकर्‍यांसाठी गुलाबराव देवकरांचा ‘एल्गार’ : धरणगाव तहसिलवर शनिवारी संघर्ष मोर्चा

0

धरणगाव |  प्रतिनिधी :  घरकुल घोटाळ्यातील कायदेशीर संघर्षनंतर आता माजी पालकमंत्री, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ‘एल्गार’ पुकारला आहे.

‘शेतकरी बांधवांनो…मागितल्या शिवाय मिळणार नाही, हे दळभ्रदी सरकार हालणार नाही’ अशी आक्रमक साद देत गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तहसिलवर शनिवारी (दि.२०) शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन केले आहे.

राज्यात शेतकरी त्रस्त आणि सत्ताधारी मस्त असे चित्र आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आघाडीने आंदोलन केले मात्र, सरकार याबाबत गंभीर नाही.

कर्जमाफीसह कृषीपंपासाठी अखंडीत विजपुरवठा, शेतीमालाला हमीभाव, कापसाला सात हजाराचा भाव मिळावा, धरणगावच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम त्वरीत मार्गी लागावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यंानी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफी हवीच!

शेतकरी संघर्ष मोर्चा आयोजनामागील भुमिका श्री.देवकर यांनी स्पष्ट केली. शेतकर्‍यांच्या सातबारा कोरा करण्याची राष्ट्रवादीची मागणी जुनीच आहे. शेतकर्‍यांना कर्जाची भिती नसती तर त्याने आत्महत्या केलीच नसती. म्हणूनच कर्जमाफी हा एकच पर्याय असल्याचे श्री.देवकर म्हणाले.

वृध्द शेतकरी आणि भुमिहिन शेतमजूराला पेंन्शन लागू करावे, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दाखले उपविभागीय कार्यालयातूनच मिळावे, दोनगाव, कानळदा येथे गिरणेवरील दोन प्रस्तावित बंधार्‍यांचे काम त्वरीत सुरू करावे, अंजनी-गिरणेचे पाणी दोन्ही वराड, मुसळी, चिंचपूरा, एकलग्न आदी गावातील शेतकर्‍यांना मिळावे, अंजनी कालव्याचे काम त्वरीत पुर्ण करावे यांसह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे श्री.देवकर म्हणाले.

दोन वर्ष वाया गेली

घरकुल घोटाळ्यातील कायदेशीर अडचणीमुळे माझ्या आमदारीची दोन वर्ष वाया गेली. मला काम करण्यासाठी मिळालेल्या तीन वर्षात धरणगाव तालुक्यासह मतदार संघात कोट्यावधींची भरीव कामे केली. ही सर्व कामे दृष्य स्वरूपात आहेत.

मात्र, माझ्यानंतर या कामां व्यतिरिक्त एकही मोठे काम तालुक्यात झालेले नाही. तालुक्याचा विकास खुंटला आहे. धरणगाव शहराच्या जलशुध्दीकरणाचे काम रखडले आहे. बालकवींचे स्मारक, क्रिडासंकुल, तेली तलावाचे सुशोभिकरण याबाबत कोणीही पुढाकार घेवून प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

माझी दोन वर्ष वाया गेली नसती तर ही सर्व कामे पुर्ण करून शहराचा कायापालट केला असता असा दावा गुलाबराव देवकर यांनी केला.

आता विकास हाच ध्यास

चार-पाच वर्ष लोकांपासून दुर राहावे लागल्याचे दु:ख आहे. मात्र, तालुक्यातील गावा..गावातील जनता जेव्हा आपल्या व्यथा, वेदना घेवून हक्काने येतात…‘आप्पा, विकास खुंटला आहे, तुम्ही संपर्कातून गेल्यापासून आता पर्यंत परिस्थिती काहीच बदलेली नाही’अस सांगतात तेव्हा जनसेवेसाठी नवी उर्जा मिळते.

आपल्यावरील जनतेचा विश्‍वास पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे वाटत असल्यामुळेच आपण आता पुर्ण ताकदीनिशी सक्रीय झालो आहोत. विरोधात असलो तरी विकास हाच ध्यास ठेवून आपण मतदारसंघात जनसंपर्क दृढ करत असल्याचे श्री.देवकर यांनी सांगितले.

मंत्री झालात आता काम करा!

दहा वर्ष आमदार होतो तेव्हा विरोधी पक्षात असल्याने काम होत नाही, अशी ओरड केली जात होती. कालांतराने सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले तर म्हणे मंत्री पद मिळत नाही…कामे कशी करणार? असा बहाणा केला गेला.

सुदैवाने आता मंत्रीपदही मिळाले मात्र, कामे काहीच होत नसल्याची टिका श्री.देवकरआप्पा यांनी राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे नाव व घेता केली.

पालिकेतील पराभव अनाकलनीय

धरणगाव शहरात मी विविध विकासकामे केली होती. पालिकेची सत्ता आली तर विकासाला गती देता आली असती. धरणगावकर सत्ता देतील असे वाटले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा झालेल्या पराभव अनाकलनीय असल्याचे श्री.देवकर म्हणाले.

गेल्या दोन दशकांपासून शहर बकाल बनले आहे. तरी सुध्दा वारंवार ही चुक धरणगावकर का करतात? नागरिकांना काय पाहिजे? हे त्यांना ठरवावेच लागले. पालिका निवडणूक काळात प्रचारासाठी प्रत्यक्ष येता आले नाही. कदाचीत यामुळेच आम्ही धरणगावकरांना पटवून देण्यात कमी पडलो असावेत.

मात्र, आता असे होणार नाही. धरणगावकरांचा हक्काचा माणूस म्हणून आपण शहराच्या कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गुलाबराव देवकर याप्रसंगी म्हणाले.

निवडणूक लढणार

आगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार आणि जिंकणारच असल्याचा विश्‍वास गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला. लोकांच्या भावाना तिव्र आहेत. बोलबच्चन आणि प्रत्यक्ष काम करणार्‍या माणसाला जनता ओळखू लागली असून याबाबत उघडपणे बोलू लागली असल्याचे श्री.देवकर म्हणाले.

राष्ट्रवादी नाही सोडणार !

भाजपात जाणार का? याप्रश्‍नाच्या उत्तरावर त्यांनी ही ठरवून पसरविण्यात आलेली अफवा होती. मात्र, यानंतर भाजपाच्या मोठ्या नेत्याकडून प्रवेशाबाबतचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट देवकर आप्पा यांनी केला.

शरद पवार आणि राष्ट्रवादी यांनी आपण कधी स्वप्नातही विचार केले नव्हते ते प्रत्यक्षात दिले. पवारसाहेबांचे प्रेम मिळाले यापेक्षा कोणतीच संधी मोठी राहू शकत नाही याची जाणिव असल्यानेच आपण तो प्रस्ताव नम्रपणे नाकारला.

राष्ट्रवादीला आयुष्यात कधीच सोडणार नसल्याचे त्यांनी याप्रसंगी ठासून सांगितले.

LEAVE A REPLY

*