भुसावळला ११० कोटींच्या अमृत योजनेस मंजुरी

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  शहरासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या अमृत योजनेस मंजुरी मिळाली असून लवकरच योजनेंतर्गत कामांना सुरूवात होणार असल्याने शहर विकासाला चालना मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या ११० कोटीच्या अमृत योजनेस दि.१७ मे रोजी मंजुरी देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात याबाबत निविदा प्रक्रिया राबवून महिनाभरात निविदेला मंजुरी द्यावी लागणार.

योजनेचा पहिला टप्पा मंजुर झाला असून निधी व योजना मंजुरीनुसार वेगवेगळ्या टप्प्यात विकासकामे होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दि.१७ रोजी नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांची मुंबईत संबंधित अधिकार्‍यांशी बैठक झाल्यानंतर ११० कोटीच्या अमृत योजनेस मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ. संजय सावकारे व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

अमृत योजने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या उपस्थितीत आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांची बैठक दि. २२ मे रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याचे आ.सावकारे यांनी सांगितले.

या योजनेत शहरात १० पाण्याच्या टाक्या, १०० किमी ची पाईप लाईन, नवीन जलशुध्दीकरण केंद्र, तापी पात्रात नवीन बंधारा या गोष्टीचा समावेश असणार आहे. योजनेच्या पुढील टप्प्यात विविध विकासकामांचा समावेश असणार असल्याचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सांगितले.

दीपनगरच्या नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पाला मंजुरी – दीपनगर औष्णिक विज निर्मिती प्रकल्पाच्या वाढीव नवीन ६६० मेगावॅट विजनिर्मिती प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या नवीन प्रकल्पामुळे राज्याच्या विज निर्मितीत वाढ होेवून विजेचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे.

दीपनगर प्रकल्पाच्या प्रस्तावित ६६० मेगावॅट प्रकल्पाला दि.१७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. प्रकल्प मंजुरी व निर्मितीतील तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प परत जाण्याच्या मार्गावर असतांना आ.संजय सावकारे यांनी पाठपुरावा करून शेतकरी, नागरिकांची अडचण समजनू मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने नवीन प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदीला दिला असल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

मुबलक शुध्दपाणी मिळणार – आ.सावकारे

भुसावळ शहरातील पाणी पुरवठा योजना ५० वर्षे जुनी आहे. मात्र आज शहराचा विस्तार वाढला आहे. वाढीव भागात पाणी पुरवठा होत नाही. सध्याचा व भविष्यात होणारा वाढीव भाग लक्षात घेवून आगामी २५ वर्षांचे नियोजन करून अमृत योजना मंजुर करण्यात आली आहे.

या योजनेतील एका टप्प्याला अंतरिम मंजुरी मिळाली असून याबाबत सोमवार दि.२२ मे १७ रोजी मंत्रालयात पुन्हा बैठक होणार आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यावर नागरिकांना मुबलक शुध्द पाणी मिळणार आहे.

या योजनेतील उर्वरित टप्पे जसजसे मंजुर होतील तसतसे शहराचा कायापालट होईल. अशी प्रतिक्रिया आ.संजय सावकारे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

LEAVE A REPLY

*