जामनेर तालुक्यात औद्योगिक क्षेत्रासाठी 400 एकर सरकारी जमीन उपलब्ध

0

जामनेर । दि.9 । प्रतिनिधी-राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांने तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी 400 एकर सरकारी जमिन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना कब्जे हक्काने उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे जळगाव परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना रास्त भाव मिळणार असून 15 ते 20 हजार बेरोजगार तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ना.गिरीष महाजन यांचे टेक्सटाईल्स पार्क स्वप्न पूर्ण होणार असून कापसावर आधारीत मोठे उद्योग सुरू होणार असल्याने जामनेर तालुका औद्योगिक क्षेत्रात क्रांती करणार हे स्पष्ट झाले आहे.

जामनेर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मुख्य पिक कापूस असून 80 टक्के शेतकरी पांढरे सोने म्हणजे कापसाचे उत्पन्न घेत असतात त्यामुळे शेतकर्‍यांच्या कापसाला हमी भाव मिळावा म्हणून उत्पादीत होणार्‍या कापसावर आधारीत मोठा उद्योग उभा करण्याचे स्वप्न ना. महाजनांचे होते.

स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने ना.महाजन मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून दोन हजार एकर जागेवर टेक्सटाईल पार्क व अन्य उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उद्योग व महसूल विभागाकडे सतत पाठपूरावा केला.

त्यांच्या या प्रयत्नांना यश येवून टेक्सटाईल्स पार्कसाठी यापूर्वी 1500 एकर खाजगी जागा संपादीत करण्यात आली होती. याच शिवारात वनविभागाची 400 एकर सरकारी जमीन देण्याचा निर्णय शासनाने 9 नोव्हेंबर रोजी घेवून तसा आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाला आहे. ही जमीन जामनेर तालुक्यातील गारखेडा, अंबिलहोळ शिवारातील आहे.

टेक्सटाईल्स पार्क मध्ये उभारण्यात येणार्‍या उद्योग व्यवसायासाठी वाघूर धरणातून 24 तास पाणी साठा उपलब्ध होणार असल्याने पाण्याची मोठी अडचण दुर होणार आहे.

गारखेडा परिसरात उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पाजवळ भुसावळ व जळगाव रेल्वेमार्ग जवळ असल्याने त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे जामनेर तालुक्याचाच नव्हे तर जळगाव जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होणार असून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा लाभ मिळेल व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

*