साठवण बंधार्‍यातील गाळाचा निधी काढला परस्पर

0

जळगाव । दि. 9 । प्रतिनिधी-चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे साठवण बंधार्‍यातील गाळ काढण्याच्या कामासाठी मंजूर निधी परस्पर काढून घेतल्याचा प्रकार जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. संबंधितांची चौकशी करण्यात येवून कारवाई प्रस्थापित करण्याची मागणी बैठकीवेळी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा ना.उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. साठवण बंधार्‍याच्या कामासाठी गेल्या वर्षी प्राप्त 3 लाख 14 हजार रूपयांचा निधी परस्पर काढून घेत काम झाले नसल्याचा प्रश्न सभापती पोपट भोळे यांनी मांडला.

या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सदस्य लालचंद पाटील, पल्लवी सावकारे, प्रभाकर सोनवणे, मीना पाटील, रोहन पाटील, पवन सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, बी. ए. बोटे आदी उपस्थित होते.

लघु सिंचन विभागातंर्गत पाझर तलावांसाठी शेतकर्‍यांच्या भुसंपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. शेतकर्‍यांना वेळेवर मोबदला न मिळाल्याने लघुसिंचन विभागातील संगणक, प्रिंटर जप्तीची कारवाई झाली आहे.

इतकेच नाही तर सीईओंची गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची बदनामी होत असल्याचा मुद्दा सदस्या पल्लवी सावकारे यांनी मांडला असून, जिल्हा परिषदेच्या परत जाणार्‍या निधीतून शेतकर्‍यांना काहीतरी मोबदला देण्याची तरतुद करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला असून, पावसाळ्यात देखील काही गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे. या दृष्टीने उन्हाळ्यात टंचाई अधिक जाणविण्याच्या दृष्टीकोनातून टंचाईचा कृती आराखडा तयार करताना जास्तीत जास्त गावांचा समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सीईओ बद्दल सदस्यांनी व्यक्त केली नाराजी
जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन समितीच्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे पालकमंत्र्यांच्या आयोजित बैठकीला होते. तर अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर रजेवर असल्याने उपस्थित नव्हते. यामुळे जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी नसल्याने सभेला उपयोग नाही. गेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेला देखील सीईओ नव्हते आणि आजच्या सभेला देखील नसल्याने सर्वच सदस्यांनी सभेत सीईओ दिवेगावकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*