ग्रामस्थ जि.प.अध्यक्षांच्या दालनात

0

यावल । दि.9 । प्रतिनिधी-तालुक्यातील दगडी मनवेल परिसरातील रस्त्यांची कामे न करता परस्पर निधी लाटल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी जि.प.अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेवून चौकशीची मागणी केली.

तसेच गेल्या महिन्यात आलेल्या पीआरसी कमिटी समोर खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी हा प्रश्न विधानसभेत देखील उपस्थित करणार असल्याचे आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले आहे.

माजी जि.प.सदस्या सौ.विद्या महाजन यांनी मनवेल-दगडी-गिरडगाव रस्ता खडीकरण 2 लाख 94 हजार 557 रूपये, मनवेल-दगडी-डांभुर्णी रस्ता 1 लाख 99 हजार 795 रूपये इतक्या रकमेचा निधी मंजुर करून 31 डिसेंबर 2016 रोजी वर्क ऑर्डर काढली. मात्र प्रत्यक्षात काम न करता बळीराम आदिवासी सहकारी सोसायटी हातेड ता.चोपडा या संस्थेच्या नावाने निधी खर्च करण्यात आला.

साकळी शिवारात ताईच्या मळ्याजवळील रस्त्याचे काम 2 लाख 46 हजार 288 रूपयांचे मंजुरअसून 31डिसेंबर 2016 रोजी वर्क ऑर्डर निघाल्यावर द्वारका म.सहकारी सोसा.लि. ता. चोपडा या संस्थेच्या नावे निधी काढण्यात आला आहे.

ज्या ठेकेदारांनी ही कामे घेतली त्यांनी ही कामे कधी, किती दिवसात व कोणी पूर्ण केली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ज्या पं.स. इंजिनिअरने दिले त्यांनी कोणत्या राजकिय पक्ष पदाधिकार्‍याच्या दबावापोटी दिले?

इंजिनिअरवर जर दबाव असेल तर त्यांनी गटविकास अधिकारी, जि.प. कार्यकारी अभियंता व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कानावर का टाकले नाही?डेप्युटी इंजिनिअर यांनी याकडे का दुर्लक्ष केले? का ते ही या निधी हडप प्रकरणात सहभागी आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणी दै.देशदूतने दि. 8 रोजी सडेतोड वृत्त प्रसिध्द करताच प्रशासनात खळबळ उडाली. माजी जि.प. सदस्य विद्या महाजन यांनी जि.प. मध्ये जावून पत्र व्यवहार केला.

तसेच मनवेल येथील रहिवासी विनायक पाटील, लिलाधर पाटील, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, गजानन पाटील, महेंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, हुकूमचंद मंगलसिंग पाटील, सुनिल शांताराम पाटी यांच्यासह 25-30 शेतकर्‍यांनी शिरसाड सरपंच तथा शिवसेना युवा सेनाप्रमुख गोटू सोनवणे, तालुका उपप्रमुख विनायक पाटील यांच्यासोबत जि.प. अध्यक्ष यांच्या दालनात जावून भेट घेतली. त्यानंतर आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी जावून याप्रकरणी लक्ष घालण्याबाबत निवेदन दिले.

त्यावर प्रा.सोनवणे यांनी लागलीच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच दै.देशदूतच्या वृत्ताचा आधार घेवून अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचेही आश्वासन दिले.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आव्हान – रस्त्यांची कामे न करताच निधी लाटल्याप्रकरणी यावल पं.स.मधील इंजिनिअर, डेप्युटी इंजिनिअर, ठेकेदार व बिल काढण्यासाठी राजकिय दबाव टाकून संगनमताने बिले काढण्यात आल्याने त्यांच्या विरोधात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले असून याप्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आहे.

LEAVE A REPLY

*