खनिकर्म प्रतिष्ठानवर पालकमंत्र्यांच्या खाजगी स्वीय्य सहाय्यकाची वर्णी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यातील खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरीता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानवर चक्क पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या मर्जीतील खाजगी स्विय्य सहायकाची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रतिष्ठानच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये गौण खनिजाच्या उपशामुळे संबंधीत क्षेत्रातील रस्ते, धुलीकण, पाणी पातळी यांची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासासाठी खाण व खनिजे सुधारणा अधिनियम २०१५ मधील कलम ९ (ब) मधील तरतुदीनुसार जिल्हानिहाय खनिकर्म प्रतिष्ठान स्थापन करण्यासंदर्भात बाब शासनस्तरावर विचाराधीन होती.

त्यानुसार राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येऊन जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानवर तीन लोकप्रतिनीधी, समाजसेवी संस्थांचे प्रतिनीधी आणि खाणपट्ट्याशी संबंधीत व्यक्तींची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते

.त्यानुसार जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानची स्थापना करण्यात येऊन त्यावर कार्यकारी परीषदेवरील सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यात सदस्य म्हणुन माजी पालकमंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. उन्मेष पाटील आणि शिवसेना आ. किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच सेवाभावी संस्थांमधुन जलश्री वॉटरशेड सर्व्हेलियन्स आणि रिसर्च इन्स्टीट्युटच्या स्वाती संवत्सर आणि भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी यांची नियुक्ती आहे. तर खाणपट्टाधारकांचे प्रतिनीधी म्हणुन स्वप्नील पाटील, स्वप्नील बडगुजर आणि रौनक संकलेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परदेशी पालकमंत्र्यांचे स्विय्य सहाय्यक

सेवाभावी संस्था म्हणुन भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी हे मुळात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचे मर्जीतील खाजगी स्विय्य सहाय्यक आहेत. जळगाव जिल्ह्यात इतरही सेवाभावी संस्था आहेत. मग त्यांच्यातील कुणाची नियुक्ती का नाही?

गौण खनिजाच्या महत्वाच्या प्रतिष्ठानवर पालकमंत्र्यांच्याच मर्जीतील स्विय्य सहायकाचीच वर्णी का? तसेच अशी नियुक्ती करतांना कोणते निकष लावले गेले? असे एक ना अनेक प्रश्‍न काही सेवाभावी संस्थांनी उपस्थित केले आहे.

दरम्यान पालकमंत्र्यांच्या मर्जीतील या स्विय्य सहायकाच्या वर्णीमुळे खनिकर्म प्रतिष्ठानच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*