नोटबंदीवरुन रणकंदन

0

नवी दिल्ली । दि.8 । वृत्तसंस्था-नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारकडून आज ‘काळा पैसाविरोधी दिन’ साजरा होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अनेक पक्षांनी तसेच विविध संघटनांनी नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेसने ‘काळा दिवस’ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नोटबंदीचे वर्षश्राद्ध घातले. नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला झालेल्या त्रासाचा पाढा सर्वच विरोधकांनी वाचला. देशभर निषेध मोर्चे, निदर्शने, निषेध सभा घेण्यात आल्या.

याउलट भाजपच्या प्रमुख नेत्यांनी देशाच्या विविध भागांत पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांशी संवाद साधत नोटबंदीचे समर्थन केले. एकूणच नोटबंदीवरून आज सर्वत्र रणकंदन पाहावयास मिळाले.

नोटबंदीचे समर्थन आणि विरोध करणार्‍या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटबंदीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

नोटबंदीने लाखो कष्टकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याची टीका राहुल यांनी केली. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नोटबंदीवरून मोदी सरकार आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नोटबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांत 58 टक्कयांनी वाढ झाली आहे.

सर्व जण ङ्गकॅशलेसफ व्यवहार करत असून डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बाब असल्याचे गडकरींनी सांगितले. नोटबंदीमुळे देशातील काळ्या पैशांचा छडा लागला, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोटबंदीची उपयुक्तता स्पष्ट केली.

काळ्या पैशांचा छडा लागला- मुख्यमंत्री


नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून आज देशभर ‘काळा पैसाविरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नोटाबंदी निर्णयाचे समर्थन केले. नोटबंदी निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी रूपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे होत आहे याची कोणतीही नोंद नव्हती. नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पांढरा पैसा भारतात आणा-चव्हाण


सांगली । दि.8 । वृत्तसंस्था । काळा पैसा आणण्याआधी देशाचा बाहेर गेलेला पांढरा पैसा भारतात आणा, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी चव्हाण यांनी शायरीच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले. सांगलीत आज जनआक्रोश आंदोलनाचा समारोप झाला. त्यावेळी झालेल्या मेळाव्यात चव्हाण बोलत होते. आधी मुंबईतील लोकल गाड्यांची व्यवस्था सुधारा. लोक किड्या-मुंग्याप्रमाणे मरतात, पण यांना बुलेट ट्रेन आणायची आहे. हजारो कोटी रुपये खर्चून त्याचा फायदा कुणाला होणार आहे? असे म्हणत चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली.

भाजपची किव येते-अजितदादा


पुणे । दि.8 । प्रतिनिधी । मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला हिटलरी हुकूमशाही पद्धतीने अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी मोर्चा काढण्यात आला. नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष उलटले. मात्र सरकारने अद्यापही किती काळा पैसा बाहेर आला ते सांगितले नाही. भाजप नोटबंदीच्या निर्णयाचे सेलिब्रेशन करते याची कीव येते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मंदी हा कांगावा-पाटील


जालना । दि.8 । वृत्तसंस्था । नोटबंदीमुळे मंदी आल्याचा केवळ कांगावा करण्यात आला आला आहे. देशात कुठेही महागाई किंवा मंदी नाही, असा दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणूस खुश झाला आहे. लोक कॅशलेस व्यवहारांकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नोटबंदीचा विपरीत परिणाम कुठेही दिसून येत नाही. उलट कॅशलेस व्यवहारांसाठी लोक अनुकूल झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले. वर्षानुवर्षे रक्त शोषून ज्यांनी नोटा जमा करुन गादीत भरल्या त्यांना त्या नोटा बँकेत जमा कराव्या लागल्या, असा दावाही पाटील यांनी केला.

 

LEAVE A REPLY

*