शेळगाव प्रकल्पाच्या पिलर उभारणीचा २२ नोव्हेंबर ला शुभारंभ : आ.हरीभाऊ जावळे यांची माहिती

0
भुसावळ | प्रतिनिधी  : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या तापी नदीवरील शेळगाव प्रकल्पाच्या पिलर उभारणीचा शुभारंभ येत्या २२ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रालयातील जलसंपदा विभागात आयोजित बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आ.हरीभाऊ जावळे यांनी दिली आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरिष महाजन होते. यावेळी राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, रावेरचे आ.हरिभाऊ जावळे, चाळीसगावचे आ.उन्मेश पाटील, आ.स्मिताताई वाघ, आ.चंदुलाल पटेल यांच्यासह जलसंपदा विभागाचे प्रधानसचिव श्री.चहेल, प्रशांत मोरे, श्री.पानसे, श्री.उपासनी, श्री.देशपांडे यांची उपस्थिती होती.

शेळगाव प्रकल्पाच्या कामाला वेळेचे बंधनही लावून देण्यात आले असून एक वर्षे एक महिन्यात म्हणजेच दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बॅक वॉटरमुळे भुसावळ-यावल रोड वरील अंजाळे येथे नव्या पुलाच्या व पिळोदा ता.यावल येथील मोर नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या निविदा येत्या १५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

तसेच यावल आणि जळगाव या दोेन तालुक्यांना जोडणार्‍या शेळगाव प्रकल्पाजवळील तापी नदीवरील पुलाच्या बांधकामाची निविदा ३१ नोव्हंेंबर २०१७ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. आ.हरिभाऊ जावळे यांनी आग्रहीपणे मांडलेल्या भुसावळ जवळील हतनूर धरणाच्या प्रास्ताविक आठ गेटच्या कामाची माहिती ३० नोव्हेंबर पर्यंत शासनास सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दिले.

जळगाव जिल्ह्यातील वरखेडे-लोंढे या निम्न प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०१८ ला पूर्ण होणार आहे. कुर्‍हा-वढोदा, वरणगाव-तळवेल, बोदवड उपसा या उपसा सिंचन योजनांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण केले जातील असे जलसंपदा विभागाने बैठकीत सांगितले असल्याचेही आ.जावळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*