जळगाव-मनमाड दरम्यान रेल्वेचा तिसरा ट्रॅक

0
नवी दिल्ली |  वृत्तसंस्था : रेल्वेची वाढती ट्रॅफीक बघता जळगाव-मनमाडदरम्यान नवीन तिसरा ट्रक व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. मात्र वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असतांनाच आज मनमाड-जळगावदरम्यान रेल्वेच्या तिसर्‍या इलेक्ट्रिक ट्रॅकला आज मंजुरी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून बुधवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई ते भुसावळदरम्यान दुहेरी रेल्वे लाईन असली तरी वाढत्या प्रवाशी गाड्या व मालगाड्यांमुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत होता.

त्यातच अनेक गाड्यांना लहान रेल्वेस्थानकावर थांबवून काही गाड्या पुढे काढल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशी गाड्या व मालगाड्यांना विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

याबाबत भुसावळ विभागाने मनमाड-भुसावळदरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनचा प्रस्तावदेखील रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला होता. मात्र अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव धुळखात पडलेला असतांनाच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पुढे आला.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या विविध विस्तारीकरणाचा मुद्दा लक्षात घेता जळगाव-मनमाडदरम्यान तिसर्‍या लाईनला मंजुरी दिली.

विशेष म्हणजे गतकाळात माजी खासदार व रावेरचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळ. जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील, रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी वेळोवेळी या तिहेर मार्गासाठी प्रयत्न केले होते.

मनमाड-जळगाव मार्गावरील वाढती ट्रॅफिक कमी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये १६० किमी लांब हा ट्रॅकचे काम करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला १०३५ कोटींचा खर्च येईल असा अंदाज आहे. हे संपूर्ण प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

या नव्या लाईनमुळे जळगावच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, जळगाव-भुसावळ या मार्गावरील तिसर्‍या आणि चौथ्या लाईनचे काम सध्या सुरु आहे.

LEAVE A REPLY

*