बोदवडच्या सरकारी आरोग्य यंत्रणेचे ओझे एकाच डॉक्टरवर!

0
बोदवड |  बोदवड तालुक्यात रूग्णांची सेवा करणारे ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ एकाच वैद्यकिय अधिकार्‍यांच्या भरवशावर सुरू आहेत. बोदवड ग्रामीण रूग्णालयात एक वैद्यकिय अधिक्षक आणि तीन वैद्यकिय अधिकारी असे चार पदे असतांना तेथे केवळ एकच वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे आणि एणगाव व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातही दोन ऐवजी एक -एक डॉक्टर कार्यरत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.

बोदवड तालुका अवर्षण ग्रस्त आहे, तालुक्यात उद्योग -व्यवसायासाठी पोषण वातावरण नाही. शेतकरी व शेतमजुरांची संख्या अधिक आहे. पर्यायाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची संख्या अधिक आहे. तसेच स्वच्छता आणि इतर आरोग्य विषयक जागरूकता नसल्याने रूग्णांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र तालुक्यातील तिन्ही सरकारी रूग्णालयाचा सरंजाम केवळ एक -एक वैद्यकिय अधिकार्‍यावर अवलंबून असल्याने डॉक्टरांची दमछाक आणि रूग्णांची पिळवणूक होत आहे.

ग्रामीण रूग्णालय वार्‍यावर

वैद्यकिय निदान हे कोणत्याही रूग्णासाठी अत्यावश्यक असते. त्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामीण रूग्णालयासाठी एक वैद्यकिय अधिक्षक आणि तीन वैद्यकिय अधिकारी अशी पदे निर्धारित केली आहेत. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून बोदवड ग्रामीण रूग्णालयात केवळ एकच डॉ.अमोल पवार कार्यरत आहत. वैद्यकिय अधिकारी एकच असल्याने चोवीस तास वैद्यकिय सेवा देणे शक्य नाही त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांची हेळसांड होत आहे.

लोकप्रतिनिधीची अनास्था

बोदवड तालुक्यातील विविध राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. या ठिकाणी वैद्यकिय अधिकार्‍यांची पदे तात्काळ भरण्यात यावी. म्हणून पाठपुरावा सुध्दा केलेला नाही. म्हणून अद्याप शासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे. बोदवड मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात आहे. भाजपाचे जेष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे विभागाचे नेतृत्व करित आहेत. त्यांनी आरोग्य यंत्रणे संदर्भात लक्ष घालून वैद्यकिय अधिकार्‍यांची पदे तत्काळ भरण्यास पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्राथमिक केंद्रे सरस

बोदवड तालुक्यात एकूण दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. येवती आणि एणगाव येथील या आरोग्य केंद्रांमध्ये समाधानकारक वैद्यकिय सेवा मिळत असल्याचे चित्र आहे.

एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.योगेश पाटील वैद्यकिय अधिकारी आहेत. गेल्या काही वर्षापासून ते येथे कार्यरत असल्याने व रूग्णालयातच तळ ठोकून राहत असल्याने परिसरातील रूग्णांनी चांगली सेवा घडत आहे. या ठिकाणी सुध्दा दोन वैद्यकिय अधिकारी अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्ष एकच डॉक्टरवर भार दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*