मनपाच्या 12 कर्मचार्‍यांना शिस्तभंगाची नोटीस

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-महापालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर सकाळी 11.30 वाजता हजेरी पत्रकाची उपायुक्तांनी तपासणी केली. यावेळी वेगवेगळ्या विभागातील 12 कर्मचारी विनापरवानगीने गैरहजर आढळून आले.

त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येवू नये? असा आशयाची उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा मागविला आहे.

महापालिकेत काही सह्याजीराव कर्मचारी स्वाक्षरी करतात आणि निघून जातात. तर काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर न राहता उशिरा येत असल्याची तक्रार प्रशासनाने प्राप्त झाली.

काही कर्मचारी विनापरवानगीने गैरहजर राहत असल्याचीही ओरड केली जात आहे. मागील आठवड्यात प्रभारी आयुक्तांनी 45 सह्याजीराव कर्मचार्‍यांना नोटीस बजावली होती. तर काही कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश दिले आहे.

त्याच अनुषंगाने उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी कार्यालयात येवून तब्बल तासाभरानंतर सर्व विभागप्रमुखांकडून हजेरी पुस्तक मागवून तपासणी केली.

यात आरोग्य विभाग, आस्थापना विभाग, जन्म-मृत्यू विभाग, बारनिशी विभाग, बांधकाम विभाग, प्रकल्प विभागातील 12 कर्मचारी विनापरवानगीने गैरहजर आढळून आले. त्यामुळे संबंधित 12 कर्मचार्‍यांना मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 56 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येवू नये?

असा आशयाची नोटीस बजावून तीन दिवसाच्या आत विभाग प्रमुखांमार्फत खुलासा मागविला आहे. दिलेल्या मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा समर्पक खुलासा न आल्यास संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*