ऑनलाईन विरोधात जिल्ह्यातील शिक्षक एकवटले

0

जळगाव । दि. 4 । प्रतिनिधी-ऑनलाईनच्या अतिरिक्त ताणामुळे चाळीसगाव तालुक्यातील शिक्षकाचा बळी गेला असल्याने ऑनलाईनच्या निषेधार्थ व शासनाकडून लादल्या जाणार्‍या ऑनलाईन कामांच्या विरोधात जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने व्रजमुठ उगारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हयातील जवळपास 4 हजारापेक्षा अधिक प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते.

जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली दुपारी 1 वाजता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून मुक मोर्चाला शिस्तबध्द पध्दतीने सुरूवात झाली.

सुरवातीला ऑनलाईनमुळे प्राण गमाविलेल्या चाळीसगाव येथील शिक्षकाला श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर मोर्चा टॉवर चौक, नेहरु चौक, कोर्ट चौक मागर्र्े जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडकला.

याठिकाणी महिला शिक्षक अर्चना पाटील, रेखा रुले, गजाला तबस्सुम, प्रमिला मोरे, विद्या बारोले यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना संबोधित केले.

त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून व्यथा मांडून निवेदन सादर करीत शासनाचा निषेध केला. यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे विलास नेरकर, ईश्वर सपकाळे, सुनिल पाटील, विजय बागुल, लिलाधर सपकाळे, भगवान वराडे, शिवाजी पाटील, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, किशोर पाटील-कुंझरकर, अजय पाटील, महेश पाटील, राजेश पवार, बापु साळुखे, राकेश पाटील, दिलीप पाटील, अल्ताफ सर, नफीस सर, श्रीमती पाकीजा पटेल, अरुणा उदावंत, मनिषा पाटील, समन्वयक अजबसिंग पाटील, राजेश जाधव यांच्यासह जिल्हयाभरातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.राजूमामा भोळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

मोर्चातील फलकांनी वेधले लक्ष
गुरुंजीचा केला आचारी.. पुरे झाली लाचारी.., ऑनलाईन आदेशाचा भडीमार गुरुजी झाले बेजार, बदली धोरणांतील त्रुटी दुर झाल्याच पाहिजे, संगणक परिक्षेला मुदतवाढ मिळाली पाहिजे, शिकू द्या शिकू द्या.. आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या या मोर्चातील फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

महिलांनी केले मोर्चाचे नेतृत्व
डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून मुक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाचे नेतृत्व महिला शिक्षकांनी केले. मोर्चात महिला शिक्षकांचा मोठा सहभाग असून जिल्हाभरातील 4 हजारापेक्षा अधिक शिक्षक या मूकमोर्चासाठी एकत्रित आले होते.

महिला शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मांडल्या व्यथा
जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चातील महिला शिक्षक पाकीजा पटेल, संगिता मगर, छाया सोनवणे, विद्यादेवी कदम, अफशा नरन्नुम खान, मनिषा पाटील या महिलाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर केला.

या आहेत शिक्षकांच्या मागण्या
शाळास्तरावर शिक्षकांद्वारे करण्यात येणारी विविध ऑनलाईन विषयक कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणुक करण्यात यावी, दि.23 ऑक्टोबर 2017 रोजीचा निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणीबाबत काढण्यात आलेला शासनिर्णय रद्द करण्यात यावा, शिक्षकांच्या बदल्या झाल्याच पाहिजे परंतु हे होत असतांना कोणावरही अन्याय होवू नये म्हणून दि.27 फे्रबुवारी 2017 रोजीच्या शासन निर्णयात आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करून बदल्या मे 2017 मध्ये करण्यात याव्यात, संगणक अर्हता पास होण्याची मुदत वाढवून मिळावी,नोंव्हेबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शालेय पोषण आहार योजनेचे काम स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात यावे, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी या मागण्यासंदर्भात जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*