अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाने शेतकर्‍यांमध्ये नवी उभारी -आ. जावळे

0

जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-अ‍ॅग्रोवर्ल्डचे राज्यस्तरीय कृषी व पशू प्रदर्शन म्हणजे शेती उपयोगी यंत्रे, तंत्रे, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टरे व अवजारे, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्ये, दूध काढणी मशिन, कोंबड्या व शेळ्यांच्या विविध जाती, मोत्याच्या शेतीचे प्रात्यक्षिक, यासह इतर माहितीचा खजिनाच आहे. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर नवा दृष्टिकोन प्राप्त झालेल्या शेतकर्‍यांमध्ये उभारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी येथे केले.

शहरातील शिवतीर्थ मैदानावर राज्यस्तरीय कृषी व पशू प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड- 2017 ला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी आ.जावळे बोलत होते.

या वेळी महापौर ललित कोल्हे, आ.राजुमामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्लॅन्टो कृषीतंत्रचे संचालक निखिल चौधरी, श्रीराम ठिबकचे कार्यकारी संचालक श्रीराम पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन, ग्रब अ‍ॅग्रोटेकचे संचालक कैलास मगर, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, के. एफ. बायोफ्लान्ट, ग्रब अ‍ॅग्रो, श्री साईराम प्लास्टिक व गोदावरी फाउंडेशन हे सहप्रायोजक आहेत.

चार दिवसीय कृषी प्रदर्शनासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जिल्हा परिषद जळगाव, वसुंधरा पाणलोट, आत्मा तसेच इतर शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

शासकीय विभागांसाठी स्वतंत्र दालन असल्याने शेतकर्‍यांना सर्व शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत आहे. प्रदर्शनस्थळी ट्रॅक्टरे, अवजारे व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी मोठी जागा राखीव ठेवली आहे. त्याचाही लाभ शेतकर्‍यांना घेता येणार आहे.

याशिवाय पशुपालकांसाठी हिरव्या चार्‍याचे व्यवस्थापन, मूरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अ‍ॅझोलाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्याची व्यवस्था आहे. दूध काढणी यंत्रांच्या नामांकित कंपन्यांचेही स्टॉल्स याठिकाणी आहेत.

छोट्या शेततळ्यात लाखभर उत्पन्न देणारी मोत्यांची शेती, हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. याशिवाय शेततळ्यांचे विविध आकार, शेळ्या, कोंबड्या, दुधाळ गायींच्या जाती यांची इत्युभूत माहिती अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनास भेट देणार्‍या शेतकर्‍यांना मिळत आहे.

प्रदर्शनात शेती व शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची चर्चासत्रेही आयोजित केली आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी पुणे येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके यांनी गटशेती विषयावर, तर माळशेज अ‍ॅग्रोचे हर्षवर्धन पानसरे व के. एफ. बायोप्लान्टचे शरद पवार यांनी पॉलिहाऊसमधील शेतीचे मार्गदर्शन केले.

 

LEAVE A REPLY

*