श्री बद्रिनारायणाच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीक्षेत्र बहादरपूर येथे आज रथोत्सव

0
पारोळा | श.प्र. : श्री बद्रिनारायणांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र बहादरपूर येथे आज रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर हे एक छोटसं टुमदार गाव बोरी नदीच्या काठावर वसलेलं. गावाच वैशिष्ट्य असं की, भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे देवस्थान श्री बद्रिनारायणाचे मंदिर. या मंदिराच्या स्थापनेचा थोडक्यात इतिहास असा.

सन १९१९-२० मध्ये बहादरपूर येथील कै.श्रीमंत रामलाल काळूराम मिश्र (मालक) हे सपत्नीक हिमालयातील श्रीबद्रिनाथ यात्रेला गेले होते. तेव्हा आता सारख्या प्रवासाच्या सोयी-सुविधा नव्हत्या. खुप खडतर प्रवास करून ही यात्रा पुर्ण करावी लागे. असा खडतर प्रवास करत मिश्र मिश्र दाम्पत्याने मंदिरात प्रवेश केला. त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले. गाभार्‍यातील श्री नारायणाच्या मूर्तीकडे पाहून प्रवासाचा क्षिण नाहिसा झाला. मन तृप्त झाले.

पण आंतरीक इच्छा अशी होती की श्री नारायणाच्या पायांना स्पर्श करावा. सपत्नीक आपल्या हाताने अभिषेक करावा म्हणून ते पुढे पुढे जात होते. परंतु त्यांना रोखण्यात आले. गाभार्‍यात प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आला. त्यांना असे सांगण्यात आले की गाभार्‍यात ङ्गक्त ब्राह्मरांनाच प्रवेश दिला जातो. त्यावर त्यांनी सांगितले की, ‘मी सुध्दा ब्राह्मणच आहे’ पण तेथील पुजार्‍याने त्यांचे काही एक ऐकले नाही.

बाहेरूनच दर्शन करून मिश्र दांपत्य धर्मशाळेत परतले. श्री नारायणाच्या पद स्पर्शाची व अभिषेकाची अपूर्ण राहिलेली इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. झोप येत नव्हती. पहाटे पहाटे त्यांना गाढ झोप लागली आणि काय आश्‍चर्य? साक्षात श्री बद्रिनारायण र्त्ीयांच्या समोर प्रकटले. आणि म्हणाले ‘माझी पूजा करायची तुझी तीव्र इच्छा असेल तर मी तुझ्या गावाला येतो. तुझ्या गावात माझी प्रतिष्ठापना कर. जसा मी येथे आहे तसाच मी तेथे देखिल असेल. असा दृष्टांत देवून भगवंत अंतर्धान पावले.

त्यांना जाग आली. घडलेला प्रसंग सहप्रवाशांना सांगितला. मन धन्य झाले. उर्वरीत यात्रा पूर्ण केली. मिश्र दांपत्य बहादरपूर गावी परतले. ते मनी ध्यास घेऊनच. तो ध्यास होता श्री बद्रिनारायणाची स्थापना करण्याचा. ते कामाला लागले. हिमालयातील मंदिरासारखेच सुंदर भव्य मंदिराचे बांधकाम करायचे ठरले. त्यासाठी त्यांनी आपल्या मालकीचे शेत श्री बद्रिनारायण संस्थानच्या नावे केले.

हिमालयातील बद्रिशपंचायतनासारख्या मूर्त्या राजस्थान येथील मुर्तीकार गोविंदराम उदेराम यांच्याकडून बनवून घेतल्या. मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले. काशी येथील विद्वान पंडीतांकडून शास्त्रोक्त पध्दतीने श्री बद्रिनारायणजी, श्रीलक्ष्मीजी, श्री केदारनाथजी, उध्दव, कुबेर, गणपती, नर, नारायण, नारदेव, गरुडाची संगमरवरी पांढर्‍या शुभ्र पाषाणाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तो दिवस होता ज्येष्ठ शु.१० शके १८४६ दि.१२ जून १९२४.

श्री बद्रिनारायणाची दैनंदिन पूजा, अभिषेक, आरतीसाठी पुजार्‍याची नेमणूक केली. हा खर्च भागवण्यासाठी स्वत:च्या मालकीची जमिन संस्थानास दान केली. दैनंदिन पूजा, दिवाबत्ती, आरती, मंदिर उघडणे, बंद करणे यासाठी नियम केले. आजही अखंडपणे नियमानुसार मंदिराचे सर्व व्यवहार होतात.

सर्व जाती धर्माच्या लोकांना श्री बद्रिनारायणाचे जवळून दर्शन घेता यावे, पुजा अर्चा करता यावी यासाठी श्रीमंत रामलाल मिश्र (मालक) यांनी यात्रोत्सव सुरू केला. यासाठी वहन, रथ व पालखीची निर्मिती केली. दरवर्षी कार्तिक शु.त्रयोदशीला वहन, चतुर्दशीला रथ व पौर्णिमेला पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. पालखीत विराजमान झालेल्या श्रीबद्रिनारायणाची पूजाअर्चा व जनसामान्यांना स्पर्श करून करता येते.

यावेळी कोणताही भेदभाव केला जात नाही. महिलांनाही दर्शन व पुजेची अनुमती असते. केवढे हे महानभाग्य! पालखी धरण्याचा मान भोई समाजाकडे असतो. रथाला मोगरी लावणे हे अत्यंत कौशल्याचं काम असते. त्यासाठी जुन्या अनुभवी लोकांसोबत नवीन लोक काम करतात.

यात्रोत्सवात लेझीम, आखाडे, भारतीयम, मल्लखांब, दगडीगोटा उचलणे, मदगुल ङ्गिरवण इ.मर्दानी खेळांचे प्रदर्शन केले जाते. रात्री नारदीयकिर्तन श्रवणाचा लाभ भाविक घेतात. पालखीच्या दिवशी संध्याकाळी जंगी कुस्त्यांची दंगल होते. त्यासाठी लांबलांबचे मल्ल कुस्त्या खेळण्यासाठी येतात.

विजेत्यांना यथायोग्य बक्षीस दिले जाते. पालखीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. प्रसादासाठी दानशूर व्यक्तींनी कायमस्वरुपी ठेव म्हणून यथाशक्ती काही रक्कम दिली आहे. त्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी महाप्रसाद दिला जातो.

आता श्रीबद्रिनारायण मंदिर श्रीक्षेत्र बहादरपूरला पर्यटनस्थळाचा ‘ब’दर्जा मिळाला आहे. दर वर्षी शासनाकडून येणार्‍या निधीतून मंदिर विकासाचा कालबध्द कार्यक्रम आखलेला आहे. त्यातून कूपन, भक्तनिवास, रोषणाई इ. सुविधा करण्यात आल्या आहेत.

सध्या देवस्थानचा कारभार कै.मालक यांचे दत्तकपुत्र नारायण रामलाल मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली विश्‍वस्त मंडळ करत आहे. विश्‍वस्त मंडळ असे, श्रीनारायण मिश्र मुख्य ट्रस्टी, गुलाब सहादू पाटील उपमुख्य ट्रस्टी, सर्वश्री ट्रस्टी – निशीकांत वैद्य, भिकाजी भावसार, जगतराव पाटील, मांगो बडगुजर, वामन वाणी, गजानन सिंधी, दगडू महाजन, आसाराम चौधरी, भगवान अमृतकर, नंदकिशोर शिंपी, दामू भोई, जिजाबराव पाटील, सचिव देविदास वाणी, पुजारी श्रीहरी दिक्षीत, सेवक सुभाष पाटील आदी विश्‍वस्त मंडळ काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*