ऊस दराची बैठक निष्फळ ; मुख्यमंत्र्यांनंतर आता सहकारमंत्र्यांचाही अभ्यास सुरू

0

मुंबई । दि. 2 वृत्तसंस्था-ऊस दराबाबत कोणताही निर्णय न झाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. सहकारमंत्र्यांनी ऊस दरावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती.

राज्यातील शेतकरी संघटनांसोबत बोलावलेल्या बैठकीत सरकार आणि संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचीही माहिती मिळत आहे.

संघटनांचे प्रतिनिधी 3 हजार 500 रुपयांच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात आले.

आता 8 नोव्हेंबरला ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीत ऊस दराचा निर्णय होण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनांनी या हंगामातील उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांची मागणी केली आहे.

त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, रयत क्रांतीचे सुरेश पाटील
उपस्थित होते.

कमी एफआरपी का ?
गुजरात किंवा बाहेरच्या ठिकाणी एकाच पक्षाचे राज्य आलेल्या ठिकाणी एफआरपीचा भाव चांगला दिला जातो. राज्यात मात्र कमी एफआरपी का दिली जाते, असा सवाल यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.

राज्यातील ऊस उत्पादकांनी कमी पैसे का घ्यायचे? असेही त्यांनी यावेळी म्हटले. आम्हाला आमच्या हक्काचे शंभर किलो साखरेचे पैसे द्या इतकीच मागणी करीत आहोत.

उसाला प्रतिटन 3 हजार 500 रुपये आम्हाला द्या. कारखानदारांना सर्व लाभ दिला जात आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकर्‍याला यापासून वंचित ठेवले जात आहे.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर कोणत्याही कारखान्याला ऊस देणार नाही, असा इशाराही रघुनाथदादा यांनी यावेळी दिला.

 

 

LEAVE A REPLY

*