स्तनांचा कॅन्सर रोखण्यासाठी महिलांनी संतुलीत आहार घ्यावा : कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निलेश चांडक

0
जळगाव |  प्रतिनिधी :  स्तनांच्या कॅन्सरबाबत महिलांनी जागृक राहिले पाहिजे. छोटीशी गाठ असली तरी त्याचे डॉक्टरांकडून निदान करून घेतले पाहिजे, स्तनाचा कॅन्सर हा आजार झपाट्याने वाढत असून हा आजार रोखण्यासाठी महिलांनी योग्य आहार, व्यायाम व योगा यास प्राधान्य दिले पाहिजे. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अधिक असावा तर साखर व तेलाचे प्रमाण कमी असावे, असा सल्ला कॅन्सरतज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी दिला.

जागतिक स्तन कॅन्सर जनजागृती मासानिमित्त जिल्हा नियोजन भवनात मुक्ती फाऊंडेशनच्यावतीने शासकीय महिला अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती बबिता कमलापूरकर, चांडक यांचे आई-वडिल उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ. चांडक यांनी कॅन्सरचे प्रकार, कॅन्सर होण्याची कारणे,कॅन्सर रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदिंबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कॅन्सर हा असाध्य आजार असला तरी या आजाराची प्राथमिक लक्षणे ओळखता आल्यास ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून हा आजार रोखता येतो. यासाठी नागरीकांनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या प्राथमिक लक्षणांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

कॅन्सर हा आजार तंबाखु, सुपारीसारख्या पदार्थापासून होतो. उपस्थितांनी या आजाराविषयीची माहिती जाणून घ्यावी व ती इतरांनाही सांगावी. या आजाराविषयी जनजागृती होणे आवश्यक असून याची लक्षणे ओळखता आल्यास त्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांकडून निदान करुन घेता येईल व त्यावर त्वरीत उपचार घेता येतील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कार्यशाळेस शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नर्सिंगचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांकडून डॉ.निलेश चांडक यांचे कौतुक

डॉ. निलेश चांडक यांनी कॅन्सरविषयीची कार्यशाळा घेऊन समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.ग्रामीण भागात जनजागृतीचे काम आशा वर्कर व आंगणवाडी सेविका करीत असतात. त्यांना या आजाराविषयीची माहिती दिल्यास त्या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या आजाराविषयी चांगल्याप्रकारे जागृती करतील.

डॉ. चांडक यांनी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी करून डॉ. चांडक यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*