पाचोरा तालुक्यात दारूबंदीच्या आदेशाची पायमल्ली : कायद्याच्या रक्षकांकडून हप्तेबाजी ?

0
लक्ष्मण सुर्यवंशी  | पाचोरा  :    सर्वोच्च न्यायालयाने जनहिताचा निर्णय घेवून राष्ट्रीय महामार्गात येणारे बियरबार, वाईन शॉप, देशी, विदेशी मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाचोरा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील दारू विक्रीची दुकाने बंद करण्यात आली अहेत.

परंतु हा आदेश पारित झाल्यापासून शहर व तालुक्यात ही दुकाने, गार्डनवर मद्य विक्री व पिण्याची ठिकाणे वरवर बंद असली तरी गार्डनरूपी हॉटेलांमध्ये सर्रास ज्यादा दराने मद्यविक्री सुरू आहे. तसेच शहरात व खेड्यात पानटपर्‍या, हातगाड्या व अन्य ठिकाणांवर दारू विकणे, पिणे असे प्रकार सुरू असून याकडे स्थानीक पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाच्या आशिर्वादातून व कानाडोळा होत असल्याने दारूबंदीच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

तर शहरात एकमेव वॉईन शॉपला मोजमापात मिळालेल्या अभयामुळे भर चौकात असणार्‍या या दुकानावर दारू घेण्यासाठी ग्राहकांच्या चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावर उभी करून रहदारीची कोंडी होत असल्याने शहराच्या नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हातगाड्या, अंडापावच्या गाड्या व अनेक ठिकाणांवर दारूडे खुलेआम दारू पिण्याच्या प्रकाराने शहराच्या कायद्याची वाट लागली आहे.

छत्रपती शिवाजी चौकात दारूड्यांचा हैदोस

पाचोरा शहराचा आत्मा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक सद्यस्थितीला दारू विक्रीचा व दारू पिणार्‍यांचा अड्डा बनला आहे.

शिवाजी चौक, मानसिंगका कॉर्नर वरील दोन दुकाने, शिवसेना कार्यालया जवळील देशी दारू दुकान, रोड वरील अंडापाव, सोडा विक्रीच्या गाड्यांवर ब्रॅन्डी हाऊस दुकानावरून दारू बियार बाटल्या घेवून दिवसा व रात्री पर्यंत खुलेआम दारू पिण्याच्या प्रकारात भरमसाठ वाढ झाली आहे.

मद्यविकणारे व दारू पिणार्‍यांना कायद्याचा कोणताच धाक उरलेला नाही.  भविष्यात शिवाजी चौक व अनेक ठिकाणांवर कोणताही भयानक गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्टेशनरोड, मध्यवर्ती चौक ते मानसिंगका कॉर्नरवर दिवस रात्र दारूड्यांचा वावर वाढल्याने या रोडवरून सुज्ञ नागरीक, महिला, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक जाण्या-येण्यास घाबरत आहेत. हा चौक व्यवसायासाठी नव्हे तर दारू विक्री व दारूड्यांचा चौक म्हणून गणला जात असून युगपुरूष छत्रपतींच्या नावाला व शहराच्या संस्कृतीला घातक ठरत आहे.

पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अभय ?

पाचोरा शहरातील मध्यवर्ती भाग, मुख्य रहदारीचे रस्ते तसेच शहराबाहेरून जाणारा भडगाव रोड, जारगाव चौङ्गुली ते जळगाव चौङ्गुली, ग्रामीण भागाला जोडणारे रस्त्यांवरील दुकाने कागदोपत्री बंद असली तरी या रोडवरील गार्डनरूपी बियरबार, पानटपर्‍या व अन्य कानाकोपर्‍याच्या ठिकाणांवर ज्यादा दराने मद्य विक्री करून दारू पिण्याची सोय करून दिली जात आहे. व जास्त किंमतीने दारू विकण्याचा धंदा तेजीत आला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आणि कायदा सुव्यवस्था व शांततेला आव्हान देणार्‍या या गंभीर प्रकाराकडे माहीती असूनही स्थानीक पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी व पोलीसांकडून डोळेझाक करून अभय दिले जात आहे.

अशा प्रकारांना आळा घालून बेकायदेशिर दारू विक्री व पिणार्‍यांवर या दोन्ही विभागांनी मुसक्या आवळण्याची गरज असतांना बिरबार चालक व गुप्त ठिकाणांवर मद्य विक्री करणार्‍यांकडून हप्तेबाजी करून हजारो रूपये उकळले जात असल्याची चर्चा वाढल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक, उत्पादन शुल्क अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी गोपनिय माहीती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

वृत्तपत्रांच्या बातम्यांमुळे हप्तेखोरांची चांदी

न्यायालय निर्णय व कायद्याचा अवमान करून नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री व पिण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी निष्पक्ष व सत्यपरिस्थीतीचे वृत्तांकन करणार्‍या लेखणिच्या शिलेदारांकडून लिहीलेल्या व प्रसारीत झालेल्या बातम्यांची दखल घेवून कठोर व तत्काळ कार्यवाही करण्या ऐवजी स्थानिक पोलीस उत्पादन शुल्क व एल.सी.बी. विभाग या व्यावसायीकांकडून बातम्यांचे भांडवल करून हजारो रूपयांची तोडीपाणी करत असल्याचे प्रकार व चर्चा आहे. जनहितासाठी लिहीलेल्या बातम्यांमुळे हप्तेखोरांची चांदी होऊ लागली आहे.

समाजसुधारणेचा आव आणणार्‍या संघटना गायब?

दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारी तरूण पिढी, संसार, नशेत झालेल्या अपघातांमुळे नाहक अवेळी जाणारे बळी, हाणामारी अशा घटना व कायद्याचा प्रश्‍न निर्माण करणारे प्रकार रोखणे आवश्यक आहे.

व्यसनापासून तरूण पिढीचा बचाव, गोरगरीबांचे मोडणारे संसार या सारख्या मानव व समाज हिताच्या रक्षणासाठी शहरातील राजकिय, सामाजीक, व्यसनमुक्ती संघटना, महिला संघटना यांनी आवाज उठवून शहरात व ग्रामीण भागात सुरू असेला प्रकार थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहीजे. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मात्र समाज सुधारणेचा आव आणणार्‍या सर्वच संघटना गायब झाल्या की काय? असा प्रश्‍न जनतेला पडला आहे.
लहान मोठ्या कार्यक्रमातून प्रसिध्दीसाठी निवेदने, मोर्च, आंदोलने, उपोषण, रस्ता रोको करणार्‍या चमकोगिरांपैकी पाचोरा शहर व तालुक्यात दारूबंदीच्या आदेशाची पायमल्ली होत असतांना कुणीही आता पावेतो निवेदने दिली नाही.

तसेच युगपुरूषाच्या नावाच्या चौकाला कलंक लावणार्‍या प्रकाराला व मद्यविक्रीची दुकाने अन्यत्र हलविण्यासाठी कोणत्याही राजकिय, सामाजिक, व्यसनमुक्ती, किंवा महिला व अन्य समाज सुधारक पुढे येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मोजमापात पाप? ची चर्चा

पाचोरा शहराच्या मध्यवर्ती चौकात सुरूच असेल्या मद्यविक्रीच्या दुकाना बाबत उलट सुलट चर्चा आहे. चाळीसगाव-भडगाव व अन्य तालुक्यातील शहर२ातील मध्यवर्ती ठिकाणांवरील वाईन शॉप, ब्रॅन्डी हाऊसची दुकाने नियमानुसार बंद झाली असताना पाचोर्‍यातील हिच एकमेव मद्यविक्रीची दुकान कशी काय वाचू शकते असे न उलगडणारे कोडे सर्वांना पडले असून नेमके कोणाच्या आशिर्वादातून मोजमापात पाप? घडले अशी कुजबूज व चर्चा सुरू आहे.

तसेच कायद्याच्या रक्षकांकडूनही हप्ते बाजी होत असल्याने नागरीकांमधून प्रचंड नाराजीचा सुरू उमटत आहे.

LEAVE A REPLY

*