एसटी कर्मचारी संपावर ठाम

0

मुंबई । दि.17 । वृत्तसंस्था-सणासुदीच्या काळात एसटीच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कर्मचार्‍यांना आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते.

कामावर रुजू न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र कर्मचार्‍यांनी महामंडळाचे हे आवाहन धुडकावले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्यासोबतच इतर मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी ऐन दिवाळीच्या काळात संपाचे हत्यार उपसले आहे.

गाड्या रस्त्यावर आणायच्याच नाहीत, अशी भूमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कर्मचार्‍यांकडून सुरू आहे. मात्र सरकारने कर्मचार्‍यांच्या संपाला दाद न देता खासगी बस गाड्या आगारात बोलावून प्रवाशांची सोय करून दिली.

राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला लोकोपयोगी सेवा घोषित केल्याने एसटीच्या कर्मचार्‍यांनी संप केल्यास त्यांना तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.

त्यामुळे औद्योगिक न्यायालयाने घेराव, निदर्शने, मंदगतीने काम करणे या गोष्टींना प्रतिबंध केल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*