जळगावच्या काव्यरत्नावली चौकात १८० विद्यार्थ्यांनी साकारले किल्ले : आशा फाऊंडेशन , युवाशक्ती फाऊंडेशनचा उपक्रम

0
जळगाव | प्रतिनिधी  :  आशा फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात आयोजित ‘किल्ला बनवा’ स्पर्धेचे उद्घाटन आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल ३६ संघांनी सहभाग नोंदवला असून १८० विद्यार्थींनी मातीपासून किल्ले साकारले आहेत.

काव्यरत्नावली चौकात किल्ला बनवा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष निलेश चौधरी, सचिव अरूण सपकाळे, प्रशांत फौंडेशनचे संचालक प्रशांत महाशब्दे यांची उपस्थिती होती.

यावेळी आ.राजूमामा भोळे म्हणाले की, मातृभूमितील ऐतिहासिक वास्तुंची ओळख होवून आपल्या मातीशी नाळ जुळण्यासाठी किल्ला बनवा स्पर्धा आवश्यक आहेत. येणार्‍या पिढीला आपला इतिहास कळावा तसेच त्याबद्दल अभिमान वाटावा म्हणून उपयुक्त असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष निलेश चौधरी यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धेतील किल्ला अचूक व चांगला बनण्यासाठी कलाध्यापक संघातर्फे ऋषिकुमार चौधरी यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धकांना किल्ल्यांचे प्रकार व स्थापत्यातील बारकावे त्यांनी समजावून दिले.

प्रास्ताविक आशा फौंडेशनचे प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन व्यवस्थापिका सुजाता बोरकर यांनी केले. स्पर्धेत एकूण ३६ संघांमधून १८० स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण उद्या दि. १६ रोजी ४ वाजता होणार आहे.

नागरीकांना इतिहासकालीन युगाचा अनुभव घेता यावा यासाठी स्पर्धेनंतर सहभागी स्पर्धकांनी तयार केलेले किल्ले नागरीकांना पाहण्यासाठी दि. १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत प्रदर्शनही खुले ठेवण्यात येईल.

स्पर्धा व प्रदर्शन उपक्रमाच्या यशस्वितेसाठी भवरलाल व कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन, महावीर वेलर्स, जळगाव शहर महानगर पालिका या संस्थांनी सहकार्य केले.

आशा फाऊंडेशनतर्फे माधुरी पुंडे, मधुकर पाटील, प्रदीप पवार, वसुधा शिगवण – सराफ तसेच युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे विराज कावडीया, अमित जगताप यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*