वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जिल्हा रुग्णालयाची पाहणी

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाकडून शिक्षण विभागाकडे हस्तांतरी करण्यात आले आहे.

दरम्यान आज शिक्षण विभागाचे सहसंचालकांसह वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करुन महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले.

जिल्ह्यात शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, विशेष कार्य अधिकारी डॉ. चक्रधर मुंगले यांनी जिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागांची पाहणी केली.

तसेच रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शरीर रचना शास्त्र, शरीर क्रिया व जीवरसायनशास्त्र या तीन विषयांचे विभाग सुरु करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये अधिष्ठातांचे कार्यालय, जुन्या रक्तपेढीच्या इमारतीमध्ये जीवरसायनशास्त्राचे विभाग उभारणार असून याठिकाणी ग्रंथालय, व्याख्यानकक्ष देखील सुरु करण्यात येणार आहे. पाहणी करण्यासाठी हे विभाग सुरु करण्यासाठी नियोजन समितीकडून नियोजन करण्यात आले आहे. यावेळी रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*