अधिकार्‍यांचे फाईलींपेक्षा टक्केवारीवर अधिक लक्ष

0

जळगाव । दि. 11 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेत अधिकारी कामे करीत नसल्याचा आरोप नेहमी सदस्यांकडून होत असून अधिकारी जिल्हा परिषद चालवित आहे.

तसेच अधिकारी फाईली संबंधित सदस्यांना दाखवित नसून त्यांचे फाईलींपेक्षा टक्केवारीवर अधिक लक्ष असल्याचा आरोप भाजपच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला.

दरम्यान प्रत्येक फाईली माझ्याकडे आल्या पाहिजे आम्ही भजी तळायला बसलेलो आहे का? अशा खरपुस शब्दात उपाध्यक्षांनी अधिकार्‍यांचा समाचार घेतला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समितीची सभा अध्यक्ष ना. उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहु महाराज सभागृहात पार पडली.

यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,शिक्षण सभापती पोपट भोळे,आरोग्य सभापती दिलीप पाटील,महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बि. ए. बोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीला सदस्या पल्लवी सावकारे यांनी मागील सर्वसाधारण सभेत घेतलेल्या विषयांवर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने आजच्या सर्वसाधारण सभेेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

या मागणीला शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अनुमोदन दर्शविले. जो पर्यंत व्हिडीओ चित्रीकरण व्यवस्था करण्यात येत नाही तोपर्यंत सभा चालु देणार नाही अशी भुमिका सत्ताधारी गटातील काही सदस्य, शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्यांनी लावून धरल्याने तब्बल एक तास सभेत गोंधळ सुरु होतायावेळी सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत व्यासपीठाकडे धाव घेत ठिय्या आंदोलन केले.

गोंधळ वाढत चालल्याने अध्यक्षांनी गोंधळातच अजेंड्यावरील विषयांना मंजूरी देत सभा गुंडण्याच प्रयत्न केला. गोंधळात सर्व विषयांना मंजूरी देत तीन वेळा राष्ट्रगीताची घोषणा करीत सभा आटोपण्याचा प्रयत्न झाला.

सभेच्या सुरवातीला डीपीडीसीवर निवडून गेलेल्या 27 सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सन 2017-18 च्या अंदाजपत्रकाला मागील सभेतच मंजुरी देण्यात आली असतांना आजच्या बैठकीत पीआरसी समितीच्या खर्चासाठी 15 लाख मंजुर करण्याचा विषय अवलोकनार्थ ठेवण्यात आला होता.

दरम्यान चुकीच्या पध्दतीने विषय यात ठेवू नका, पीआरसी समितीच्या खर्चासाठी आमचा नकार नसल्याचे नाना महाजन यांनी एसीईओंना सांगितले.अपंग शिक्षकांचा बदल्यांचा विषय पल्लवी पाटील व रविंद्र नाना पाटील यांनी केला. चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणा सीम येथे ग्रामसेवक येत नसल्याचे मोहीनी गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे मानधन वाढविण्यात यावे अशी मागणी सदस्या वैशाली तायडे यांनी केली. दरम्यान जि. प अध्यक्ष यांच्या निवासस्थानी व कार्यालयात तसेच अधिकार्‍यांच्या दालनात लावण्यात आलेल्या एसीची माहिती सदस्या पल्लवी जितेंद्र पाटील यांनी मागितली.

कितीही बोंबला व्हिडीओ चित्रीकरण होणार नाही
आजच्या सर्वसाधारण सभेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपातील काही सदस्य व्यासपीठावर गेले असता, अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासात असे एकदाही झालेले नसल्याने आताही चित्रीकरण होणार नाही, किती बोंबला व्हिडीओ चित्रीकरण होणार नाही. सभा चालु द्यायची नसल्यास सांगा अशा शब्दांत सदस्यांना धमकावत अरेरावी केली. यावेळी अध्यक्षांनी लोकशाहीचा खुन केल्याचा आरोप केला. यावेळी पल्लवी सावकारे व अध्यक्षा उज्वला पाटील यांच्यात शाब्दीक चकमक झाली. याावेळी अध्यक्षांनी पोलिसांना बोलवा असे सांगितले.

उपाध्यक्षांची मध्यस्थी
व्हिडीओ चित्रीकरणाच्या मुद्दयावरून सर्वच सदस्य आक्रमक झाल्याने तसेच अध्यक्षांनी सदस्यांना समाधानकारक उत्तर न दिल्याने सदस्यांनी व्यासपीठावर ठिय्या मांडला होता. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी मध्यस्थी करून सर्व सदस्यांची समजूत घालून सर्वांशी बोलून व्हिडीओ चित्रीकरणाचा विपय पुढील सभेत घेण्याचे सूचित केले.

खिचडीत आढळली अळी
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शिजविण्यात आलेल्या पोषण आहाराच्या खिचडीत अळी आढळून आली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांंनी सर्वसाधारण सभेत खिचडीचा डबा आणत संबंधीत आहार पुरविणार्‍या महिला बचत गट, गटविकास अधिकारी, तालुका महिला बालकल्याण अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासन लहान बालकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे यातून दिसून येते. संबंधीत प्रकरणाची चौकशी करण्यात येवून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, प्रभारी सीईओ संजय म्हस्कर यांनी सांगितले

जि.प.चा छापखाना सुरु होणार
जिल्हा परिषदेच्या स्वमालकीचा असलेला छापखाना अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मोठया प्रमाणात नुकसान होत असून बाहेरून छपाई करावी लागत आहे. त्यामुळे छापखाना सुरु करण्याची मागणी जयपाल बोदडे यांनी केली. यावर एसीईओ यांनी छापखान्यातील मशिनरी खराब झाली असल्याचे एसीईओ यांनी सांगितले. दरम्यान छापखाना सुरु करण्यासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात येणार असून छापखाना लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांनतर सर्वसाधारण घेण्याचा ठराव
जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेला दुपारी 1 वाजता सुरवात झाली. सायंकाळी 7.45 वाजेपर्यंत सभा सुरु होती. दरम्यान सर्वसाधारण सभा तीन महिन्यातून एकदा घेतली जात असल्याने सदस्यांचे अनेक प्रश्न असतात. त्यामुळे दोन महिन्यानंतर सभा घेण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

आमच्यामुळे तुम्ही व्यासपीठावर
डॉ. निलम पाटील यांनी जिल्हा जैविक समितीची तात्काळ बैठक घ्यावी असे सुचविले. यावेळी एसीईओ यांनी उर्वरित सदस्यांनी निवड झाल्यानंतर बैठक घेण्यात येईल असे सांगितले. यावर प्रभाकर सोनवणे या समितीत चारही पक्षाच्या सदस्यांची निवड करण्यात यावी असे सांगितले. यावर भाजपाचे सदस्य कैलास सरोदे यांनी काँग्रेसचे प्रभाकर सोनवणे यांना तुम्ही तर चारच आहे असे म्हटले. यावर प्रभाकर सोनवणे यांनी आम्ही चार असल्यामुळेच तुम्ही वर बसले आहे असे म्हणून सरोदे यांना टोला लगावला.

पोषण आहारप्रकरणी दोन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास जि.प.समोर उपोषण
सन 2014 मध्ये गोडावून मध्ये सापडलेला माल मुदतबाहय असल्याचे गोडावून मालकाने सांगितले होते. तरी देखील अद्याप पोषण आहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

एडीएने पोषण आहारप्रकरणी कुठलीही कारवाई शिल्लक नसल्याचा अहवाल दिला असून पुरवठादाराला पाठीशी घातले आहे. पोषण आहारप्रकरणी अधिकारी पुरवठादाराचे समर्थन करीत असल्याने गुन्हा दाखल न झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असे जयपाल बोदडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले.

यावर एसीईओ यांनी लिगल अ‍ॅडव्हाईजरचा सल्ला घेवून कारवाई करण्यात येईल, आम्ही कोणालाही पाठीशी घालत नसल्याचे मस्कर यांनी सांगितले.

दरम्यान तुम्ही गुन्हा दाखल करीत नसाल तर आम्हाला सांगा आम्ही गुन्हा दाखल करतो असे पल्लवी सावकारे म्हणाल्या. तसेच पोषण आहारप्रकरणी तीन वर्षात गुन्हे दाखल झाले नाही अन् ग्रामपंचायत अपहाराचे गुन्हे लगेच दाखल केले जातात असे पाचोरा सभापती सुभाष पाटील यांनी सांगितले.

दरम्यान खालून वरपर्यंत आपलीच सत्ता असतांना गुन्हा दाखल होत नसल्याने 2 दिवसानंतर जि.प.समोर उपोषणाला बसणार असल्याचे बोदडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*