सरकारविरोधात जनमत संघटीत करणार

0

जळगाव । दि.11। प्रतिनिधी-कर्जमाफी, भारनियमन, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, भाववाढ हे विषय घेऊन सरकारविरोधात जनमत संघटीत करणासाठी आगामी धोरण ठरविण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील आज जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला.

या आढाव्यानंतर पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती देतांना आ. वळसे पाटील यांनी सांगितले की, पक्षातील संघटनात्मक नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.

अध्यक्ष निवडीनंतर जिल्हा कार्यकारणीसह विविध आघाड्या व सेलच्याही कार्यकारणी लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पक्षात झालेल्या नियुक्त्यांवरून कुणीही गटबाजी न करता पक्षाच्या कामाला लागावे अशा सुचना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासुन जिल्ह्यात पक्षाचे तालुकानिहाय मेळावे घेतले जाणार आहे. जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन भाजपा सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी पुढल्या काळात जनमत संघटीत केले जाणार असल्याचे आ. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

महापालिकेसाठी आघाडीचा निर्णय वेळेवरच
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासुनच कामाला लागावे अशा सुचना देण्यात आल्या असुन आघाडीचा निर्णय वेळेवरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीबाबत शंका
राज्याती भाजपा सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत आता शंका यायला लागली आहे. कारण वादे पे वादे करणारे हे सरकार अजुनही शेतकर्‍याला कर्जमाफी देत नसल्याचे आ. वळसे पाटील यांनी सांगितले.

ना. महाजनांनी आव्हान स्विकारावे
स्व. आर.आर.पाटील यांच्या भावाचे नाव घेऊन आरोप करणार्‍या ना. गिरीष महाजनांनी स्मिता पाटील यांनी दिलेले आव्हान स्विकारावे असे आवाहन आ. वळसे पाटील यांनी केले. तसेच ना. महाजनांनी पुरावे दिल्यानंतर आम्ही त्यास उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार परीषदेस जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील, माजी आ. अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, माजी आ. दिलीप वाघ,माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आ. अरूण पाटील, समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, राज्य उपाध्यक्षा विजया पाटील, मंगला पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महानगराध्यक्ष निलेश पाटील,महिला शहराध्यक्षा निला चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*