वाहन अडवून दरोडा टाकणार्‍या टोळीला अटक

0

जळगाव । दि.11। प्रतिनिधी-साक्री, नवापूर येथे वाहने अडवून दरोडा टाकणार्‍या टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून जळगावातील दोन तर धुळ्यातील दोन अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मकरा पार्कमधील नवाबखान गुलाब खान हा कोणताही काम धंदा करीत नसताना त्याच्याकडे महागड्या दुचाकी, अतिशय महागडे बूट व उच्च राहणीमान यामुळे पोलिसांच्या रडारवर आला होता.

अशातच साक्री येथील इकबाल मोहम्मद मुस्तफा या साडी व्यापार्‍याला 1 लाख 97 हजारात लुटल्याच्या घटनेत जळगावच्या नवाब याचा समावेश असल्याची माहिती पो.नि. प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांचे पथक तयार केले होते.

मोबाईलमुळे फुटले बींग
पोलिसांनी नवाब याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेला मोबाईल हा साडी व्यापार्‍याचा असल्याचे निष्पन्न झाले.

खाकी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत महंमद शेख व धुळ्यातील जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी यांचे नाव सांगितले.

पथकाने जळगावच्या दोघांना सोबत घेत धुळे गाठले. एकास पावणे अकरा वाजता तर दुसर्‍याला मध्यरात्री दीड वाजता ताब्यात घेवून जळगावात आणले.

या चौघांनी नवापूरजवळ ट्रॅव्हल्स बसवर दरोडा टाकून हवाल्याचे 21 लाख रुपये लुटल्याची कबुली दिली. आज सायंकाळी अटक करण्यात आलेल्या नवाबखान गुलाब खान, महमद मुददसर आलम शेख रा.हुडको, शिवाजी नगर, जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी (दोन्ही रा.धुळे) या चौघांना नवापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

LEAVE A REPLY

*