जम्मूच्या बांदीपोरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद

0
जम्मू  : जम्मू काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरु आहे. अद्यापही भारतीय जवानांकडून या भागात ऑपरेशन सुरुच आहे. दोन्ही बाजूंकडून अद्यापही गोळीबार सुरूच असल्याचं समजतं.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल आउट’ हाती घेतलं आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५० अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय. विशेषत: खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवणाऱ्या मोठ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी लक्ष्य केलं आहे. सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागातील परिबाल गावात पहाटेपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.

 

LEAVE A REPLY

*