राज्यात फटाके विक्रीवर बंदी ?

0

मुंबई । दि.10 । वृत्तसंस्था-दिल्लीपाठोपाठ आता राज्यातही फटाके विक्री बंदीची चर्चा सुरू झाली आहे. फटाके विक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

विशेष म्हणजे रामदास कदम यांनी सूचक विधान केले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र फटाके विक्री बंदीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे फटाका विक्री बंदीवरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचे दिसते.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिल्लीत फटाके विक्री बंदी कायम ठेवली होती. दिल्लीत 11 नोव्हेंबर 2016 पासूनचा फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला.

फटाक्यांमुळे दिल्लीत हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण विधान केले. फटाके विक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास राज्यातील हवामान सुधारेल आणि शेवटी शेतकर्‍यांनाच याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

निवासी भागात फटाके विक्री नाही – हायकोर्ट
राज्यात निवासी भागात फटाक्यांची विक्री करता येणार नाही. फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्देश दिले आहेत.

त्या निर्णयाचे पालन राज्य सरकारने करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मालाड भागातील फटाक्यांची दुकाने जुनी असून ती पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मालाड फायरवर्क्स वेल्फेअर असोसिएशनने उच्च न्यायालयात केली होती.

त्यांची विनंती अमान्य करत उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तसेच जे परवाने यापूर्वी दिले गेले आहेत त्यांच्यावर नियमांची कडक अंमलबजावणी करून हे परवाने नियमानुसार अर्ध्यावर आणण्यात यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*