मोदींकडून जनतेचा विश्वासघात – हजारे

0

राळेगणसिद्धी । दि.10 । प्रतिनिधी-लोकपाल कायद्याची अंमल-बजावणी आणि लोकायुक्त नियुक्तीच्या प्रश्नावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर थेट हल्ला चढवला आहे.

लोकपाल कायदा पाच वर्षांत होऊ शकला नाही. पण त्यात सोयीच्या दुरूस्त्या करणारे विधेयक अवघ्या तीन दिवसांत मंजूर करण्यात आले.

पंतप्रधान मोदीच देशातील जनतेला धोका देत असतील तर देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहणार? असे अण्णा म्हणाले. भ्रष्टाचारात देशाचा वरचा क्रमांक असेल तर पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारमुक्तीच्या संकल्पावर लोक विश्वास ठेवतील का, असा सवालही त्यांनी केला.

मोदींकडून खूप अपेक्षा होत्या; पण आता त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असेही ते म्हणाले. लोकपाल, लोकायुक्तांवर सरकारचं नव्हे, तर जनतेचंच नियंत्रण राहावं यासाठी पंतप्रधानांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी- कर्मचार्‍यांना लोकपाल, लोकायुक्तांच्या कक्षेत आणायला हवं.

जनतेनं पुराव्यांसह तक्रार केली तर लोकपाल त्याची चौकशी करू शकतात. दोषी आढळल्यास शिक्षा होऊ शकते. त्यामुळंच कोणताही राजकीय पक्ष लोकपाल-लोकायुक्त कायदा अंमलात आणत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी तत्कालीन यूपीए सरकार आणि विद्यमान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवरही तोफ डागली. लोकपाल कायदा पाच वर्षांतही लागू होऊ शकला नाही.

पण त्यात सोयीस्कर दुरुस्त्या करून तीन दिवसांत विधेयक मंजूर करून घेतलं. असं करून सरकारनं देशातील जनतेला धोका दिला आहे. अशात भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करणार्‍या पंतप्रधानांवर जनता विश्वास ठेवणार का, असा सवाल त्यांनी केला.

LEAVE A REPLY

*