भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली : उध्दव ठाकरे

0
मुंबई : भाजपाच्या विकृत संस्कृतीमुळे महाराष्ट्र धर्म बुडीत निघाला आहे. प्रशात परिचारक, रावसाहेब दानवे व आता राम कदम यांच्यारूपाने महाराष्ट्र धर्म बुडीत काढला जात आहे. महाराष्ट्र धर्म, भारतीय संस्कृतीचे परदेशात गोडवे गाणार्‍या नेत्यांना मात्र आपल्याच पक्षातील अशा वाचाळविरांना आवर घालणे कठिण झाले आहे. अशा वाचाळविरांवर देशभरातून टिका होत असतांनाही त्यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी केली जात नाही. परिणामी जनतेनेच ही विकृती उखडून फेकावी अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणतात श्री. ठाकरे

काळ मोठा कठीण आला आहे. राणी पद्मिनीने स्वतःचे चारित्र्य, प्रतिष्ठा व धर्मरक्षणासाठी हजारो रजपूत स्त्रीयांसह जोहार केला. अल्लाउद्दीन खिलजी व त्याच्या मोगली अत्याचाराविरुद्धचा हा जोहार आजही हिंदुस्थानातील नारीशक्तीस प्रेरणा देत आहे, पण आजच्या युगातही भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय?

भाजपाचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे?

या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीस कोणता विकृत संदेश भाजप देत आहे? हेच त्यांचे हिंदुत्व आणि हीच त्यांची संस्कृती आहे काय? श्रीकृष्ण स्त्रीयांचा बंधू होता. त्याच नात्याने तो रक्षण करीत होता, पण श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे ‘महाभारत’ लिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही.

एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रीयांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. पंतप्रधान मोदी हे तिहेरी तलाक प्रकरणात मुसलमान स्त्रीयांना न्याय द्यायला निघाले आहेत व इथे महाराष्ट्रात स्त्री वर्गात भाजपाच्या आमदारांमुळे भीती पसरली आहे. मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री पंकजा मुंडे यांनी तरी यावर बोलावे. हे मौनही संतापजनक आहे.

स्त्री ही कुणाची माता, कुणाची भगिनी, कुणाची पत्नी आहे. कुणीही तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहावे व राम कदमांसारख्यांनी स्त्रीयांना पळवण्याची भाषा करावी! हा सगळाच प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. या ‘हराम’ कदम यांनी आता ट्विटरवरून माफीनामा जाहीर केला आहे. अर्थात तोदेखील तीन दिवसांनी.

माफी मागायला या महाशयांनी इतका वेळ घेतला यावरूनदेखील ही विकृती किती भयंकर आहे याची कल्पना येते. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. त्याविरोधात राज्यातील महिला रस्त्यांवर उतरल्या आहेत. अर्थात त्याचे राजकारण करू नका, तर ही विकृतीच मुळापासून उखडून फेका.

 

LEAVE A REPLY

*