आम्हीच नंबर 1

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-जिल्ह्यात झालेल्या 118 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. ग्रामपंचायतींच्या व सरपंचपदाच्या या रणधुमाळीमध्ये आम्हीच नंबर वन असल्याचे दावे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह जिल्हा प्रमुखांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना केले.

118 पैकी 83 ग्रा. पं. वर भाजपाचा झेंडा-उदय वाघ
जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये झालेल्या 118 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 83 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांसह सर्व सदस्य भाजपचे निवडून आले असून भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला आहे. भाजपाच्या विकासात्मक आणि पारदर्शी कारभारामुळेच जनतेनेही भाजपालाच पसंती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाबद्दलची नाराजी शिवसेनेच्या पथ्यावर- वाघ
यावेळेच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाबद्दलची नाराजी निकालातून दिसून आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात 61 पैकी 30 जागा शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेने शिवसेनेला या निवडणुकीत भरभरून मतदान केले आहे. आगामी काळात होणार्‍या निवडणुकांमधील ही विजयाची नांदी असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

काँग्रेस समाधानकारक स्थितीत – अ‍ॅड. पाटील
जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने चांगला कौल दिला आहे. भाजपा सरकारविरोधात ग्रामीण स्तरावर नाराजी वाढत असल्याचे या निकालाच्या निमीत्ताने दिसून येत आहे. भाजपाने केलेला दावा हा पोकळ असून त्यांच्या दाव्याला अर्थ नाही. भविष्यात भाजपासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सांगितले.
भाजपा फेकु, राष्ट्रवादीच नंबर वन – आ.डॉ.पाटील
14 तालुक्यांमध्ये झालेल्या 118 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचारांचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादीच या जिल्ह्यात नंबर वन असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी सांगितले. या निवडणुका चिन्हावर लढविल्या जात नसल्याने भाजपाने केलेला दावा हा फेकु असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला अपेक्षित यश – चंद्रकांत पाटील
ग्रामपंचायत निवडणुकीत रावेर लोकसभा क्षेत्रात शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले आहे. तळवेल, कोल्हाडी याठिकाणी शिवसेनेला जोरदार विजयश्री मिळाली असून रावेर लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या 22 जागा निवडून आल्या असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केला. कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी वर्गाची मोठी नाराजी भाजपावर असल्याने त्याचा फायदा शिवसेनला झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

LEAVE A REPLY

*