सेवानिवृत्त 44 कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन रोखले

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-तत्कालीन जळगाव नगरपालिकेत 1997 मध्ये जम्बो भरती करण्यात आली होती. परंतु या भरती प्रक्रियेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर शासनातर्फे लेखापरिक्षण अहवाल करण्यात आले.

लेखापरिक्षण अहवालात आक्षेप घेतल्याने 44 कर्मचार्‍यांचे निवृत्त वेतन रोखण्यात आले आहे. तसेच काही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेतन अदा केल्याने प्रशासनाला अडचणी निर्माण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेत 13 मे 1997 मध्ये 1350 पदांची जम्बो भरती करण्यात आली होती. भरती प्रक्रिया करतांना सेवा योजन, समाज कल्याण विभागाकडून यादी घेणे, जाहीरात प्रसिद्ध करणे, रोस्टरनुसार संवर्गनिहाय भरती करणे अपेक्षित होते.

परंतु रोजंदारी कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्याच्या नियमानुसार भरती करण्यात आली. तसेच चुकीच्या पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे लेखापरिक्षण करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार लेखापरिक्षण करण्यात आले असून भरती प्रक्रियेवर आक्षेप देखील नोंदविण्यात आले.

त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या 44 कर्मचार्‍यांचे निवृत्त वेतन रोखण्यात आले आहे. तसेच काही निवृत्त कर्मचार्‍यांना वेतन अदा करण्यात आले आहे. तर त्या भरती प्रक्रियेतील काही कर्मचारी कार्यरत आहेत.

काही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन अदा करण्यात आले असल्याने प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*