Blog # जळगावचे ‘खड्डेग्राम’ नामांतर करावे !

0

कर्तव्यदक्ष आणि प्रसिध्दीलोलूपतेत जळगावच्या अधिकार्‍यांचे हात कोणीच धरू शकणार नाही. ज्यांच्याकडे कामाची जबाबदारी आहे त्यांना जबादारीचा विसर पडला असून फक्त ‘चमकोगिरी’ करण्यात कर्तव्यपूर्तीचा आनंद ते घेतांना दिसत आहेत.

याला राजकीय प्रतिनिधीही मागे नाहीत. त्यामुळे राजकीय प्रतिनिधी हे जनतेसमोर अधिकार्‍यांना सुविधा देण्यावरून झाप झाप झापतात.अधिकारी त्यंाच्या हाताखालील कर्मचार्‍यांना झाप झाप झापतात. कर्मचारी गुमान ऐकून राजकीय प्रतिनिधींकडे तक्रार करतात. प्रतिनिधी अधिकार्‍यांना जाऊ द्या हो आपलाच माणूस आहे. असे सांगून ‘दिल भी मिलाओ और हात भी’ असे सांगून परत ‘चमकोगिरी’चे नवनवे शोध लावतांना दिसत आहेत.

यात बळी जातो तो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कर दात्यांचा. जळगाव शहराचे आरोग्य आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांबाबत कर्तव्यदक्ष आयुक्तांनी जी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे.

ती पाहता आता जळगावचे नामांतर करून ‘खड्डेग्राम‘ करण्यासाठी आता जळगावकर करदात्यांनी पुढे यावे. खड्डा तेथे झाड हा उपक्रम राबवून माननिय मुख्यमंत्र्यांच्या १३ कोटी वृक्षारोपणाचे लक्ष किमान जळगावात तरी साध्य करावे हे आवाहन…..

जळगावकर आणि तमाम हायवे वापरणार्‍यांनो………

हायवेवरील खड्ड्यात विशेषतः गिरणा नदीवरील पूल,जैन इरिगेशन समोरील (जेथे सत्ताधारी पक्षातील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या लाडक्या मुलाचा आदर्शचा अपघात झाला होता) खड्डयात वृक्षारोपण करावयाचा मानस आहे.

या कार्यक्रमास सर्व मंत्री विशेषत ः मा.श्री.गुलाबराव पाटील (जे पाळधी ते जळगाव हा हायवे वापरतात), मा.श्री.गिरीश महाजन,पालकमंत्री, मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील, मा.श्री.नाथाभाऊ, मा.श्री.सुरेशदादा जैन, मा.सर्व आमदार,मा.जिल्हाधिकारी, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक,बांधकाम, हायवे ऍथ्यारीटीचे अधिकारी यांनी विनंतीस मान देवून यावे. कारण मा.मुख्यमंत्री साहेबांनी १३ कोटी वृक्षारोपणचे लक्ष्य ठेवले आहेच. ते या निमित्ताने किमान जळगावकरांकडून तरी ते पूर्ण होईल.

ही सोशल मिडीयातून उमटणारी एका सामान्य करदात्या जळगावकराची प्रतिक्रिया.

दोन वर्षापुर्वी जैन इरीगेशनसमोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा एकूलता एक मुलगा आदर्श याचा मनाला चटका लावून जाणारा मृत्यू झाला होता. त्याच्या आधी महापालिकेतील अधिकारी गोपाल राजपूत यांच्याही एकुलत्या एक अभियंत्या मुलाचा शिव कॉलनी पुलावर कार उलटून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता.

त्याचा अवघ्या दहा दिवसांवर विवाह होणार होता. या घटनेनंतर जैन इरिगेशनमधील ड्युटी संपवून रात्री महामार्गाने घरी जाणार्‍या तीन कर्मचार्‍यांचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे रस्त्यावरच मृत्यू ओढवला होता.

या सर्व घटनांमुळे जळगावकर मात्र कमालीचे व्यथीत आणि भययुक्त झालेत आणि आजही आहेत. महामार्गावरील आणि शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून जनतेचा दबाब वाढू लागला. तेव्हा कोठे कर्तव्यदक्ष असलेल्या सर्व यंत्रणाना जाग आली. कागदोपत्रांची देवाण घेवाण झाली. अधिकार कक्षा आणि हद्दीचीही उहापोह झाली.

एक महिन्यात रस्ते खड्डे मुक्तीच्या घोषणाही झाल्यात. माध्यमातून अधिकार्‍यांसह प्रतिनिधीच्या सवंग बातम्याही ठळकपणे आल्यात. आणि रस्ते खड्डे मुक्तीचा सोपस्कार आटोपला. पुन्हा शहरतून जाणार्‍या महामार्गावरील, शहरातील रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अपघात होत मृत्यूच्या ‘विकासाचा‘ आलेख महागाईच्या आलेखासोबत वाढतच आहे.

विविध सामाजीक स्वयंसेवी संस्थांनीही जागृत होत पोलिस. वाहतुक पोलिस आरटीओ. महापालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, रिक्षा चालक यांच्याशी सुसंवादाचा उपक्रम घेतला. सर्वांनी छान मुद्दे मांडलेत. मात्र प्रत्यक्ष कृतीसाठी ऐकमेकांकडे बोटे दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला.

तो आजही सुरू आहे. रस्त्यातील खड्डे बुजो वा ना बुजो परंत ूया स्वयंसेवी संस्थेचा एक इव्हेंट मात्र जरूर त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेवून गेला.

जळगावकरानो… अशा किती घटना सांगायच्यात. नोकरी, व्यवसाय, शाळा, कॉलेज, क्लासेस अशा आवश्यक कामांसाठी वय वर्ष पाच ते वय वर्ष ऐंशीपर्यंतच्या सर्वानाच घराबाहेर पडावे लागते. सायकल, दुचाकी, कार, रिक्षा यासारख्या लहाण वाहनांचा ते वापर करत असतात. कारण सतरा मजलीच्या कृपेने आणि एस.टी. महामंडळाच्या आर्शीवार्दाने जळगाव शहरात सार्वजनीक वाहतुक व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

पंरतू लोक त्याचा वापर करत नाहीत हो…. पुर्वी एस.टी. महामंडळाची शहर बस सेवा होती. चाळीस ते पन्नास बसेस पहाटे पाच ते रात्री दहा पर्यंत शहराच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून तर शहरापासून किमान २० ते २५ किमीपर्यंत प्रवाशांना उत्तम सेवा देत होती. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होईपर्यंत ही सेवा सुरू होती. शहराचा विस्तार वाढत गेला तो आता भुसावळ, मोहाडी, असोदा भादली, कानळदा,पाळधी या दूरवर वाटणारी गावे आता जळगावाचेच जणू उपनगर बनत आहेत.

कालांतराने एस.टीची सेवा परवडन नाही म्हणून बंद केली. ही सेवा मनपाने जेएमटीयू नावाने सुरू केली. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात ही सेवा प्रसन्ना ट्रॅव्हल्सने करार तत्वावर सुरू केली. तीला जळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र कोठे माशी शिंकली आणि ही सेवा ठेकेदाराने बंद केली. नंतर पुन्हा ती सुरू केली. मात या बसेसला बस स्टॅड न मिळाल्याने ही सेवाबंद पडली.

या बसेससाठी रिंगरोडवरील ख्वॉजामिया जवळील जागा होती. परंतू ती देण्यात आली नाही. तर या बससेसमुळे झालेल्या अपघातात झालेला मृत्यू पाहता कालांतराने ही बस सेवा बंद झाली ती आजही बंदच आहे. त्यामुळे महापालिकेतील परिवहन समितीही कोठे हरविली ते अजुनही कळालेच नाही.

सार्वजनिक वाहतुक सेवा अर्थात शहर बस सेवा नसल्याने सायकलीं व दुचाकींची संख्या वाढली. सोबतच वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून रिक्षांची संख्याही वाढली. जुनी घरे पाडून तेथे टोलेजंग मॉल उभारले गेलेत.

मॉलमध्ये येणार्‍या ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था कागदावर असली तरी प्रत्यक्षात जमीनीवर दिसत नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क होऊ लागली. आणि रस्ते अरूंद होऊ लागले. हे कमी की काय फिरते विक्रेत्यांनीही दहा ते वीस रूपये रोज महाालिकेला डेली बाजार शुल्कातून देत या रस्त्यांवर आपला हक्क प्रस्थापित केला. यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढत गेले.

सलग अपघात झाल्यावर जनतेतून आणि माध्यमातून व्यक्त होणार्‍या असंतोषामुळे पोलिस, महापालिका यंत्रणा जागे होत कारवाईचा बडगा उगारणे सुरू केला. या कारवाईच्या बडग्यातून तडजोडीच्या नावाखाली बरीच कमाई होऊ लागल्याचे आरोपही होऊ लागले.

महापालिका आणि पोलिस यांना वसुलीचे दरवर्षी टार्गेट देण्यात येत असते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मग महापालिका आणि पोलिस यांचे ताफेचे ताफे रस्त्यावर उतरून वसुली सुरू केली. वसुली कमी आणि तडजोडीच जास्त यामुळे दिलेले टार्गेट आणि न दिलेलेही पूर्णं झाले की ही कारवाई गुलदस्त्यात. याची जळगावकरांना सवय झाल्याने तेही वसुलीच्या पावतीपेक्षा तडजोडीवरच भर दिला.

अतिक्रमण, पार्किंगचा तिढा कायमच

महापालिकेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत अनेक कर्तव्यदक्ष आयुक्त येवून गेलेत. अनेकवेळा जिल्हाधिकार्‍यांकडे प्रभारी आयुक्त पदाचा पदभार आला. परंतू ते याबाबत सपशेल अपयशी ठरले आहेत.यातील काही उपवाद वगळता अधिकार्‍यांनी मात्र विविध संस्थांच्या कार्यकमातून चमकण्याचे काम मात्र चोख केले.

जळगावरांच्या सेवेसाठी शासनाने नियुक्ती केली आहे. जळगाव समस्या मुक्त करण्याचे प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देत असतात. पंरतू त्यानुसार त्यांनी कधीही प्रयत्न केलेले नाहीत.

जळगावचे नाव खड्डेग्राम करावे

जळगाव शहर हद्दीतील सर्वच रस्ते हे आता खड्डेमय झालेले आहेत. हे रस्ते आता खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा आता जळगाव करदात्यांनी सोडून द्यावी. जळगावकरांनी राब राब राबावे आणि महापालिकेचे कर भरत भरतच या जगाचा निरोप घ्यावा. हे पक्के मनावर बिंबवून घ्यावे.

कारण अधिकार्‍यांकडे आता केवळ चमकोगिरीची नवी जबाबदारी शासनाने दिली आहे. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत त्यांनी कोठे ना कोठे चमकोगिरी करावी. त्याची सुनियोजीत प्रसिध्दी मिळवून त्याचा कात्रणांसहीत अहवाल शासनाला पाठवावा. यात राजकीय प्रतिनिधीही मागे नाहीत.

त्यामुळे महामार्गावरील खड्डे आणि शहरातील रस्ते दुरूस्त करायला महापालिकेकडे वेळही नाही आणि पैसेही नाहीत. कारण महापालिकेवर कर्जाचा बोझा आहे. हे कर्ज पिढ्यान पिढ्या खपल्या तरी फिटणार नाही. त्यामुळे जळगाव शहर स्वच्छ शहर, हिरवेगार शहर, हणगदारी मुक्त शहर, खड्डे मुक्त रस्ते यासारखी स्वप्नेच राहणार आहेत.

हो पण एक सोप्प काम आहे. ज्यासाठी कोणालाच एक रूपयाही खर्च करावा लागणार नाही. तो म्हणजे जळगावचे नामांतर करून ते खड्डेग्राम करावे. त्यासाठी आंदोलन वगैरे करण्याची गरज नाही. प्रत्येकाने टपालाच्या पत्त्यावर जळगाव खड्डेग्राम असे टाकावे.जीथे जीथे पत्ता असेल तेथे जळगाव खड्डेग्राम असे लिहावे.

यामुळे कालांतरणाने जळगाव या शब्दाला अपभ्रंश होत खड्डेग्राम हे नाव रूढ होईल. त्याची शासनदरबारी व कागदोपत्री नोंद होईल.

कर्तव्य करू या, शहर हिरवे करू या

जळगावकरानो खड्डेमय रस्त्यातून सुटका हवी असेल तर प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी कोणतेही एक रोप घेवून घराजवळील रस्त्यातील खड्डयात लावून त्याचे किमान वर्षभर तरी संगोपन करावे. यामुळे तुम्ही काही प्रमाणात समाजाचे आणि या निसर्गाचे देणे फेडल्याचे कर्तव्य पूर्ण कराल.

यासाठी महापालिकेसारखे कर्ज काढायची गरज नाही. फक्त वीस ते तीस रूपये खर्च होईल. मन की बात च्या सुरवातीस एका कर दात्या जळगावकराची व्यथा सोशल मिडीयावर फिरत आहे. त्याला प्रतिसाद म्हणून तरी रस्ता तेथे खड्डा आणि खड्डा तेथे वृक्षारोपण करावे एवढीच कळकळीची विनंती.

कारण ‘कोठे नेऊन ठेवलाय जळगाव’ माझा याला या कृतीतून तरी उत्तर देता येईल. आणि माननिय मुख्यमंत्र्यांच्या १३ कोटी वृक्षारोपणाचे लक्ष एकट्या जळगावकरांनी पूर्ण केल्याने अधिकारी आणि राजकिय प्रतिनिधींचा मुंबई दरबारी किंवा जळगाव दरबारी सत्कार समारंभाचे भव्य दिव्य असे आयोजन करता येईल.

यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन भरघोस आर्थिक मदत देईल याची एक करदाता म्हणून खात्री आहे.

चला तर जळगावकरांनो चर्चा खुप झाली आता जळगावला खड्डेग्राम आणि खड्डे तेथे वृक्षारोपण करून आपले राष्ट्रीय कार्य पूर्ण करू या…..

LEAVE A REPLY

*