परतीच्या पावसात विजांचे तांडव : शेवगे, गोंडखेड शिवारात दोन शेतकर्‍यांचा मृत्यू

0
पारोळा/जामनेर/पहूर |  प्रतिनिधी :  परतीच्या पावसाने जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार हजेरी लावली. या परतीच्या पावसात शेवगे प्र. ब. (ता. पारोळा) शिवारात विज पडून शेतकर्‍याचा तर गोंडखेड (ता.जामनेर)येथे अंगावर विज पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटना दि. ८ रोजी घडल्या. तर विज कोसळळ्याची तिसरी घटना पहूर शिवारात घडली.
शेवगे प्र. ब. शिवारात शेतकर्‍याचा मृत्यू ; दोघे जखमी

पारोळा | तालुक्यातील बोळे तांडा येथील पापालाल टिकाराम पवार (वय ६०) हे आपल्या शेवगे प्र. ब. या शेतात मजुर लावून मिरच्या तोडण्याचे काम करीत होते. दि. ८ रोजी दुपारी ३.३० वाजता जोरदाऱ पावसाला सुरूवात झाल्या मुळे शेतात कामावर आलेले मजुर गावाकडे निघून गेले.

यावेळी पाऊस येईल आणि आपले शेतातील तोडलेल्या मिरचीचे नुकसान होईल म्हणून सर्व पवार परिवार घाई घाईत निंबाच्या झाडाखाली मिरची पोत्यात भरू लागले, शेवटचे पोते भरताना पापालाल टिकाराम पवार यांनी घरच्यांना पुढे जा, वीज पडेल, असे सांगितले. परंतु, असे बोलताच त्यांच्यावरच वीज कोसळली. त्यात पापालाल टीकाराम पवार यांचा मृत्यू झाला व त्यांचे मोठे भाऊ भासु टीकाराम पवार व कलाबाई लालचंद पवार हे जखमी झाले.

त्यावेळी त्यांचा सोबत लक्ष्मण लालचंद पवार, सुदाम नरसिंग पवार, कैलास भासू पवार, गौरीबाई कैलास पवार हे घटनास्थळी होते. त्यांना सुकलाल बंधु पवार, प्रभू पवार, कैलास पवार, जगन पवार यांच्या सह गावकर्‍यांनी १०८ रुग्णवाहिकेतून पापालाल पवार यांना धुळे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.

गोंडखेड येथे तरुणाचा मृत्यू

जामनेर | तालुक्यातील गोंडखेड येथील संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता योगेश गणेश पवार (वय २४) हा त्याचे शेतात काम करीत असतांना त्याचे अंगावर विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेश हा त्याच्या आई वडीलांना एकुलता एक मुलगा होता. कुटूंबाची सर्व जबाबदारी त्याचेवर होती.

आई-वडील म्हतारे असल्याने संपूर्ण शेती तो कसत होता. आज शेतामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर महिला कामावर होत्या त्याच सोबत भुईमुग काढण्याचे कामही सुरु होते. योगेश हा देखील सकाळ पासून शेतामध्ये मजूरांसोबत काम करीत होता दुपारी २ वाजेपासूनच ढगाळ वातावरण होऊन वारा उद्धाण सुरु झाले.

अचानक मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट सुरु झाला थोड्याच वेळात पाऊसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु होताच योगेश सह मजूरही झाडाखाली आश्रयाला पळाले मात्र त्याच क्षणी प्रचंड प्रमाणात विजेचा कडकडाट होऊन विज कोसळली मी योगेशच्या अंगावर कोसळल्याने कुणाला काही समजण्याच्या आतच योगेशचा जागीच मृत्यू झाला. योगेशचा मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दैव बलवत्तर म्हणून बचावलेे

पहूर, ता. जामनेर| वार्ताहर- काळ आला होता पण वेळ आली नव्हती, दैव बलवत्तर होते म्हणूनच बचावलो… असे वीजेच्या धक्क्यातून बालबाल बचावलेले शेतकरी माधव कडूबा सोनवणे यांनी सांगितले.

पहूर शिवारात रविवारी दूपारी ३ वाजेच्या सूमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सूरुवात झाली. पत्नी, दोन मूली व मूलासह शेतात गेलेल्या शेतकरी माधव सोनवने यांच्या शेतात वीज कोसळली. या नैसर्गिक आपत्तीतून सोनवणे कुटूंब बचावले. मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली.

त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दुपारी अर्धा तास चाललेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. शेत शिवारात सध्या कापूस वेचणीचे काम वेगात आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गाची धावपळ उडाली. काही शेतकर्‍यांचा वेचलेला कापूस ओला झाल्याने मोठे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

*