कर्जमाफी : सत्ताधारीही संभ्रमात : माजी मंत्री आ.खडसे यांचा सरकारला पुन्हा घरचा आहेर

0
जळगाव | प्रतिनिधी :  सध्याच्या काळात समाजव्यवस्थेत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनाही माहिती नाही की, कर्जमाफी केव्हा मिळेल? आम्ही सत्ताधारी असुन कर्जमाफीबाबत आमच्यातही संभ्रमावस्था असल्याचे सांगत माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी आज सरकारला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला.

शहरातील कांताई सभागृहात झालेल्या लेखक अर्जुन भारूळे लिखीत ‘तर्क तरूणाचा’ या कार्यक्रमाच्या निमीत्ताने अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आ. खडसे पुढे म्हणाले की, आजच्या तरूणामध्ये रोजगार, शिक्षण, नोकरी याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

जीएसटीबाबत व्यापार्‍यांमध्ये संभ्रम आहे. आजच्या तरूणाला नेमक काय हवं आहे? तेच कळत नसल्याने आजचा होतकरू तरूण वेगळ्या मार्गाने जात आहे. ‘तर्क तरूणाचा’ या पुस्तकाच्या लेखकाने कमी वयात अनुभवाच्या जोरावर पुस्तक लिहीले आहे.

प्रतिभा शक्तीला मर्यादा नसते. ज्ञानेश्‍वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्‍वरी लिहीली. तरूणाला प्रोत्साहन आणि संधी मिळावी या भावनेतुन सर्वपक्षिय नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहील्याचे आ. खडसे यांनी सांगितले.

दिड वर्षात रूपया मिळाला नाही

माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी माजी आ. सुरेशदादा यांचे लक्ष वेधत सांगितले की, दादा दिड वर्षात एक रूपयाही जिल्ह्याला मिळाला नाही. पैसा का येत नाही हे कळतच नाही? जिल्ह्यात सद्यस्थितीला ७० टक्के डॉक्टर नाही.

आम्हीच रोग पसरवतो आणि आम्हीच उपचार करून समाजाचे नुकसान करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणाला. देशात शेतकर्‍यांप्रमाणे तरूणांच्याही आत्महत्या वाढल्या आहेत. मोकळेपणाने बोलण्याची पध्दत लोप पावल्यामुळेच आजचा तरूण भरकटत आहे.

त्यामुळे तरूणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्‍वास मजबुत करण्यासाठी संभ्रमावस्था दुर झाली पाहीजे असेही माजी मंत्री आ. खडसे यांनी शेवटी सांगितले.

भ्रष्टाचाराबाबत विचार करण्याची गरज- सुरेशदादा जैन

‘तर्क तरूणाचा’ या पुस्तकातुन लेखक अर्जुन भारूळे यांनी भ्रष्टाचारावरही आपले अनुभव मांडले आहे. प्रत्यक्षात भ्रष्टाचाराबाबत आपण जेवढे बोलतो तेवढा तो वाढतच जातो आहे. राजकारण्यांना या प्रश्‍नाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे माजी आ. सुरेशदादा जैन यांनी सांगितले.

दादा-भाऊ जोडी फुटल्याने विकास खुंटला – आ.पाटील

शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नाथाभाऊ मंत्रीपदावरून पायउतार झाले आणि सुरेशदादा माजी आमदार झाले हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. दादा-भाऊंची ही जोडी जिल्ह्याच्याच नव्हे तर खान्देशच्या विकासाला दिशा देणारी होती.

पण दादा-भाऊंची ही जोडी फुटल्यामुळे खान्देश विकासाबाबत पोरका झाल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळातुन गेल्या दिड वर्षात एक रूपयाचाही निधी मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास ठप्प झाला आहे.

पुर्वीप्रमाणे सर्वपक्षिय नेत्यांनी एकत्र येऊन एक बैठक घेऊन हा निधी मिळवुन द्यावा अशी अपेक्षाही आ. किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*