बोदवड, सावदा, निंभोरा रेल्वे पुलासाठी 90 कोटी मंजूर

0

जळगाव । दि.7। प्रतिनिधी-बोदवड, सावदा, आणि निंभोरा, रेल्वे उड्डाण पुलासाठी 90 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती खा. रक्षा खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

रावेर मतदार संघातील वाढती वाहतुक लक्षात घेता काही ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रीजचे काम करणे आवश्यक झाले आहे. वाहतुक वाढल्यामुळे बोदवड, सावदा आणि निंभोरा रेल्वे उड्डाण पुलाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

यासाठी खा. रक्षा खडसे यांच्यासह माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री ना. सुरेश प्रभु यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्यामुळे बोदवड, सावदा आणि निंभोरा या तीन ठिकाणी रेल्वे पुलांसाठी 90 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खा. रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

प्रत्येक पुलासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीत राज्य शासनाचा देखिल हिस्सा असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचा देखील पाठपुरावा राहिला असून त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून हा निधी उपलब्ध झाला आहे.

रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम केले जाणार असुन भुसंपादनासाठी मोजणीचे काम पुर्ण झाले आहे. शेतकर्‍यांनी देखिल तसे संमतीपत्र दिले असल्याचे खा. खडसे यांनी सांगितले.

येत्या दोन महिन्यात या पुलांच्या कामासाठी निवीदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसावळ व दुसखेडा येथे सब वेचे काम सुरू
भुसावळ येथील आराधना कॉलनी येथे सबवे तयार करण्यासाठी अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच दुसखेडा येथेही सबवेचे काम सुरू झाले आहे.

रावेर येथेही रेल्वे उड्डाण पुलासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली असून यात देखील राज्य शासनाचा हिस्सा राहणार असल्याची माहिती खा. रक्षा खडसे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*