जलस्वराज्य प्रकल्पातर्ंगत टंचाईग्रस्त आनोरे गावाला मिळणार धातूची टाकी : तीन महिने पुरणार पाणी

0
अमळनेर | प्रतिनिधी  : जळगाव जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना आता तीन महिने पुरेल, एवढ्या पिण्याच्या पाण्याच्या धातूच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त असलेल्या आनोरे येथे हि टाकी उभारण्यात येणार असून शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने यास मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज प्रकल्प दोन अंतर्गत हा उपक्रम भूजल सर्वेक्षण विभागातर्फे राबविण्यात येत आहे. जळगावसह औरंगाबाद, नगर, सातारा, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील ९७ टंचाईग्रस्त गावांसाठी या टाक्या उभारल्या जाणार आहेत. यात नांदेड जिल्ह्यात पहिल्या टाकीची उभारणी करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियात पिण्याच्या पाण्यासाठी पहिल्यांदा अश्या टाक्यांची उभारणी करण्यात आली होती. तसेच ठाणे जिल्ह्यात आदिवासी पाड्यांवर असाच प्रकल्प राबविला आहे.

पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि वर्षभर पाणी पुरवठ्याची योजना असूनही उन्हाळ्यात टँकर लावण्यात येणार्‍या या निकषातर्ंगत ९७ गावांची निवड करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त आनोरे हे या निकषात बसत असल्याने आ शिरीष चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.

यासाठी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून गावाची समस्या मांडल्याने या गावात एक लाख लिटर धातूची टाकी उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे आनोरे सरपंच,उपसरपंच,व ग्रामस्थांनी आ चौधरी यांचे विषेश आभार व्यक्त केले आहेत

दीड दिवसात उभारली जाते टाकी

या धातूच्या टाकीसाठी चौथरा उभारण्यासाठी अर्धातास लागतो त्यानंतर एक दिवसात टाकीची उभारणी होते, धातूचे पत्रे नट-बोल्टने जोडले जातात व आतील बाजूस पेलिमर मटेरियलचे अस्तर असते तसेच टाकीच्या शेजारी ५ हजार लिटरची टाकी उभारण्यात येते व धातूच्या टाकीतून पाच हजार लिटरच्या टाकीत पाणी घेऊन वापरण्याची सोय करण्यात येते व टाकीचे अयुष्यमान ८० वर्षांचे आहे. शिवाय टाकीतील पाणी वापरातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून क्लोरीनेटर बसविण्यात येते.

LEAVE A REPLY

*