‘अमृत’योजनेची मंजूर निविदा रद्द

0

जळगाव । दि.6 । प्रतिनिधी-अमृत अंतर्गत महापालिकेला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यानुसार निविदा मागवून सर्वात कमी दराची संतोष इन्फ्रा प्रा.लि. व विजय कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या निविदाधारकाची निविदा मंजूर करण्यात आली.

मंजुर निविदेवर हरकत घेवून जैन इरिगेशनने औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर कामकाज झाले. दरम्यान न्या.आर.एम. बोरडे व न्या.व्ही.व्ही. कणकणवाडी यांनी मंजुर झालेली निविदा रद्द करुन पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

केंद्र व राज्यशासनाच्या अमृत अंतर्गत 291 कोटीची पाणीपुरवठा योजना जळगाव महानगरपालिकेला मंजुर झाली. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणुक केल्यानंतर निविदा प्रक्रिया प्रसिध्द केली.

यात जैन इरिगेशन प्रा.लि., लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींग सर्व्हीसेस, संतोष इन्फ्रा प्रा.लि. व विजय कन्स्ट्रक्शन लि. यांच्या तीन निविदा प्राप्त झाल्या.

त्यानंतर सर्वात कमी दराची संतोष इन्फ्रा प्रा.लि. व विजय कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या निविदाधारकाची निविदा मंजूर करण्यात आली. परंतु जैन इरिगेशनने मंजुर झालेल्या निविदा धारकावर हरकत घवून नेटवर्क आणि आर्थिक क्षमता नाही त्यामुळे तांत्रिक पडताळणीमध्ये निविदा अपात्र करावी, अशा आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.

या याचिकेवर आज न्या.आर.एम. बोरडे व न्या.व्ही.व्ही. कणकणवाडी यांच्या द्विपिठासमोर कामकाज झाले असता मंजूर झालेली निविदा रद्द करुन पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

खंडपीठाने आदेश दिले असले तरी अद्यापपर्यंत सविस्तर निकाल प्रशासनाच्या हाती आलेला नाही. सविस्तर निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड.पी.आर. पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे अ‍ॅड.बक्षी, जैन इरिगेशनतर्फे अ‍ॅड.पी.एल. शहा तर संतोष इन्फ्रा प्रा.लि. व विजय कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्यातर्फे अ‍ॅड.ठोंबरे यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*