सरकार नरमले : आ.सतीश पाटील यांचे बेमुदत उपोषण मागे

0

जळगाव । दि.6 । प्रतिनिधी-गिरणेचे पाणी बोरी व अंजनीत सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतीश पाटील यांनी दि. 4 ऑक्टोबरपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले बेमुदत उपोषण आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर आज मोसंबीचा ज्युस देऊन सोडविण्यात आले.

गिरणा धरणातुन बोरी व अंजनी धरणात पाणी सोडावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतीश पाटील यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणामुळे प्रशासनासह सरकारवरील दबाव वाढत होता.

काल दि. 3 रोजी भाजपाचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, शिवसेना नेते माजी आ. सुरेशदादा जैन यांनी उपोषणस्थळी आ. डॉ. सतीश पाटील यांची भेट घेऊन पाठींबा दिल्याने संपुर्ण राज्यात या उपोेषणाची चर्चा झाली.

त्यामुळे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना या उपोेषणाची दखल घेणे भाग पडले. आज ना. गिरीश महाजन यांनी उपोषण स्थळी आ. डॉ. सतीश पाटील यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याबाबत त्यांना विनंती केली.

मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा पवित्रा आ. डॉ. सतीश पाटील यांनी घेतला. यावेळी गिरणा विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावुन लेखी आश्वासन देत ना. गिरीश महाजन यांनी आ.डॉ. सतीश पाटील यांना मोसंबीचा ज्युस देऊन उपोेषण सोडविले.

यावेळी आ. राजुमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, माजी आ. अरूण पाटील, निलेश पाटील, मंगला पाटील, उपस्थित होते.

या उपोषणात आ. डॉ. सतीश पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक विकास पवार, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, जिल्हा परीषद सदस्या स्नेहा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, माजी शहराध्यक्षा मिनल पाटील, महिला शहराध्यक्षा निला चौधरी, ओबीसी सेलच्या सविता बोरसे, युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, वकील आघाडीचे अ‍ॅड. सचिन पाटील, किसान सेलचे सोपान पाटील, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रिपाइंचाही पाठींबा
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतीश पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला रिपाइं (आ) पक्षानेही पाठींबा दिला असल्याचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, खरात गटाचे जिल्हाध्यक्ष जे.डी.भालेराव, जीवन बार्‍हे, आंबेडकरी चळवळीचे प्रताप बनसोडे यांनी कळविले आहे.

निर्णयाची वाट बघणार – आ.डॉ.सतीश पाटील
सरकारचे प्रतिनीधी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता केवळ जनतेच्या हितासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. या आंदोलनाला राज्याचे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, माजी आ.सुरेशदादा जैन यांनीही पाठिंबा दिला होता. आज जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी लेखी आश्वासन दिल्याने त्यांच्या शब्दाला मान देत उपोेषण सोडत असल्याचे राष्ट्रवादीचे आ.डॉ.सतीश पाटील यांनी जाहीर केले.

15 ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक निर्णय – ना.गिरीश महाजन
जिल्ह्यात पीक परिस्थिती चांगली असली तरी नद्या आणि धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा नाही. साधारणत: 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाची वाट बघावी लागते. त्यानंतर जिल्ह्यातील दुष्काळासंबंधी निर्णय घेता येतो. त्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस न झाल्यास गिरणा धरणातून बोरी व अंजनीत पाणी सोडण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिले.

LEAVE A REPLY

*